🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्वातंत्र्यदिनाचा आनंद क्षणात ओसरला; सांगलीत ध्वजारोहणावेळी शिक्षकाचे निधन, नेमके काय घडले?

स्वातंत्र्यदिनाचा आनंद क्षणात ओसरला; सांगलीत ध्वजारोहणावेळी शिक्षकाचे निधन, नेमके काय घडले?


देशभरात काल ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. सरकारी कार्यलय, शाळा कॉलेजसह अनेक ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. एकीकडे स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना दुसरीकडे मात्र सांगलीतील शिराळा तालुक्यात स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमादरम्यान मन हेलावून टाकणारी घटना घडली. कोकरूड येथे एका शिक्षकाचा अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. मनोहर शामराव कांबळे (वय ४५) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,मनोहर कांबळे हे कोकरूड येथील मातोश्री हिराई देशमुख प्राथमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत आयोजित ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. त्यानंतर गावातील बाजारपेठेत आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थी व्यासपीठावर स्वातंत्र्यगीत सादर करत होते. यावेळी कांबळे हे स्टेजसमोर उभ्या असलेल्या लहान मुलांना शिस्तीत उभे करत होते.

मुलांना मार्गदर्शन करत असतानाच त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले. त्यामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित नागरिकांनी आणि सहकाऱ्यांनी तत्काळ त्यांना जवळच्या घरात नेले. त्यांना साखरपाणी देण्यात आले. त्यानंतर काही वेळाने त्यांना थोडे बरे वाटले. मात्र, काही वेळातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या झटक्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

स्वातंत्र्य दिनाचा आनंदाचा सोहळा सुरू असतानाच घडलेल्या या दुर्दैवी घटनेने उपस्थितांना मोठा धक्का बसला. विद्यार्थ्यांसोबत कायम आपुलकीने वावरणारे शिक्षक मनोहर कांबळे यांच्या अचानक जाण्याने शैक्षणिक वर्तुळासह कोकरूड परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाबद्दल शिराळा तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.