🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

केंद्रीय पथकाचे सांगलीतील साखर साठ्यावर छापे

केंद्रीय पथकाचे सांगलीतील साखर साठ्यावर छापे


सांगली : केंद्रीय पथकाने पुरवठा विभागाच्या सहकार्याने गुरुवारी शहरातील सहा ठिकाणी छापे टाकून साखर साठ्याची तपासणी केली. यापूर्वी सांगली व मिरजेतील ९ ठिकाणी तपासणी करण्यात आली होती. या छाप्यात नियमानुसार कोठेही चार हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा आढळला नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. 
साखरेचे दर अचानक वाढल्यामुळे प्रशासनाने साठेबाजी रोखण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. गुरुवारी केंद्रीय पथकात 'एफसीआय'चे व्यवस्थापक जन्मजय सिंग, 'फूड ॲन्ड पब्लिक डिस्ट्रिब्युशन'चे सहाय्यक संचालक योगेश्वरुदु बोया, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलूके, साखर विभागाच्या लेखापरीक्षक शीतल चोथे आणि पुरवठा निरीक्षक राजू कदम यांचा समावेश होता. या संयुक्त पथकाने शहरातील गणपती पेठेतील तीन आणि मार्केट यार्डमधील तीन अशा एकूण सहा ठिकाणच्या दुकानांची व गोदामांची तपासणी केली. मात्र, कोणत्याही ठिकाणी मर्यादेपेक्षा जास्त साठा आढळून आला नाही. अनियमितता आढळली नसली तरी तपासणी सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दर शुक्रवारी साठ्याची माहिती देणे बंधनकारक

साखर व्यापारी व गोदाम चालकांनी प्रत्येक शुक्रवारी शासनाच्या पोर्टलवर साखरेची आवक, विक्री व सध्याचा साठा याची माहिती देणे सक्तीचे करण्यात आले आहे. मर्यादेपेक्षा जास्त साठा आढळून आल्यास 'अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५' अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.