सांगली :- 'बाळूमामाच्या मेंढरांचे दर्शन घडवून आणतो' किंवा 'घरी सोडतो' असा बहाणा करून वयोवृद्ध आजी-आजोबांना दुचाकीवर बसवून लुटणाऱ्या एका सराईत भामट्याला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. मारुती बयाजी कोटे (वय ४७, रा. हुलजंती, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे सांगली जिल्ह्यातील मिरज ग्रामीण, जत, कवठेमहंकाळ आणि आटपाडी पोलीस ठाण्यांतील ८ गंभीर गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांकडून तब्बल १४ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अशी उघडकीस आली घटना
दिनांक १६ ऑगस्ट २०२६ रोजी मिरज तालुक्यातील बेळंकी येथे एका वृद्ध महिलेला 'बाळूमामाची मेंढरे जवळच आली आहेत, तुम्हाला दर्शन घडवून आणतो' असे सांगून आरोपी मारुती कोटे याने दुचाकीवर बसवले. त्यानंतर एका निर्जन ठिकाणी नेऊन बोलण्यात गुंतवून गळ्यातील सोन्याची बोरमाळ हिसकावून पसार झाला होता. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याव्यतिरिक्त जत, कवठेमहंकाळ व आटपाडी परिसरातही अशाच प्रकारच्या जबरी चोरीच्या घटना घडल्या होत्या.
चाणक्य चौकात रचला सापळा
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांचे विशेष पथक तैनात केले. २४ ऑगस्ट रोजी गुप्त बातमीदाराद्वारे संशयित आरोपी कुपवाड येथील चाणक्य चौक परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तातडीने सापळा रचून मारुती कोटे याला ताब्यात घेतले.
८ गुन्हे उघड, १४ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त
आरोपीकडे कसून चौकशी केली असता त्याने मिरज, जत, कवठेमहंकाळ व आटपाडी तालुक्यातील निर्जन स्थळी वृद्ध आजी-आजोबांना लिफ्ट देण्याचा बहाणा करून किंवा दारू पाजून बेशुद्ध करत दागिने लुटल्याची कबुली दिली. आरोपीवर यापूर्वी कर्नाटक राज्यातही जबरी चोरीचे गुन्हे दाखल असणारा तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
जप्त केलेला मुद्देमाल:
सोन्याचे दागिने: १३,३५,००० रुपये किमतीचे ९० ग्रॅम सोन्याचे दागिने (१ मणीमंगळसूत्र, ५ बोरमाळ, ७ कानातील कुंडले, २ कर्णफुले, २ झुमके, २ कानातील साखळ्या, ६ बदाम, २ बुगड्या, २ पुडके). वाहने: १,००,००० रुपये किमतीची काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल.सदरची यशस्वी कारवाई एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सपोनि प्रशांत निशाणदार, सुभाष सूर्यवंशी, अमित परिट, सोमनाथ गुंडे, अनिल कोळेकर, नागेश खरात, अमीर फकीर व सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली असून, गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि प्रशांत निशाणदार करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.