फडणवीसांनी अंतरवालीत एवढा फौजफाटा कशासाठी लावला? मराठ्यांसोबत कुस्ती खेळायचीय का? मनोज जरांगे पाटील भडकले...
मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट म्हणजेच शनिवारपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त गावात आणि अंतरवालीकडे जाणाऱ्या रस्त्यावर लावण्यात आला आहे.
यावरून जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. मराठ्यांसोबत तुम्हाला कुस्ती खेळायची आहे का?, असा खोचक सवाल त्यांनी केला आहे.
अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या आंदोलनावर आपण ठाम असल्याचे स्पष्ट करतानाच जरांगे पाटील यांनी सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली. राधाकृष्ण विखे पाटील यांचा मराठा समाजाकडून अर्ज येत नसल्याचा दावाही जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना खोडून काढला.
सरकार आणि अधिकाऱ्यांनी आमचे अर्ज स्वीकारले नाहीत आणि आता त्यालाच उदासीनता असल्याचे सांगितले जात आहे. ज्यांनी अर्ज केले आहेत, तसेच ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, मात्र प्रमाणपत्र मिळालेले नाही, अशा सर्वांनी अंतरवाली सराटी येथे येऊन अर्ज द्यावेत, असे आवाहन त्यांनी आता केले आहे.
मराठा समाजाने घरात बसू नये, मरगळ झटकून एकत्र यावे, असे आवाहन करत जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली. निवड झाल्यानंतरही नियुक्ती न मिळालेल्या मराठा तरुणांनीदेखील अंतरवालीत येऊन अर्ज द्यावेत, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केली आहे.
आज किंवा उद्या जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी जेव्हा सरकारचे शिष्टमंडळ येईल, तेव्हा त्यांची कोंडी करण्याची पुर्ण तयारी अंतरवालीत करण्यात आली आहे. आपण जागेवर जात प्रमाणपत्रांची व्हॅलिडिटी, अर्ज केलेल्यांना प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस मधून निवड झालेल्या पण नियुक्तीपत्र न मिळालेल्या उमेदवारांना नियुक्ती मिळवून देऊ, त्याशिवाय इथून हलायचं नाही, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
जात प्रमाणपत्राच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांनी अंतरवाली सराटीत येऊन प्रमाणपत्रे का दिली जात नाहीत, याचे स्पष्टीकरण द्यावे. जिल्हाधिकारी, तहसीलदार, एसडीएम आणि जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांना एकत्र बसवून हा प्रश्न सोडवावा, जात प्रमाणपत्रासाठी मागणी करूनही त्याची अंमलबजावणी का होत नाही? याचे उत्तर सरकारने अंतरवालीत येऊन द्यावे, असे आव्हान जरांगे पाटील यांनी केले.
विखे पाटील काम करत नाहीत
मराठा उपसमितीच्या कामकाजावरही जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. विखे पाटलांकडून आपल्याला खूप अपेक्षा होत्या, मात्र ते काहीच काम करत नाहीत. एवढा माज चांगला नाही, असा हल्लाबोल जरांगे पाटील यांनी यावेळी केला. विखे पाटील यांना मराठा समाजाच्या प्रश्नांची माहितीच नसल्याचा आरोप त्यांनी केला. प्रसाद लाड आणि उदय सामंत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे जाऊन मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी करून घ्यावी, असेही जरांगे पाटील म्हणाले.
फडणवीस, शिंदेंनी तळतळाट घेऊ नये
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी काही निर्णय घेतले आहेत, हे आपण नाकारत नाही. मात्र, दुसरीकडे मराठा समाजाचे नुकसानही तेच करत आहेत, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. फडणवीस आणि शिंदे यांनी मराठ्यांच्या लेकरांचा तळतळाट घेऊ नये. काहीही झालं तरी आपण आपल्या लेकरांसाठी लढणार, असे सांगतानाच मराठा समाजातील कोणत्याही व्यक्तीने आत्महत्या करू नये, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले.
तर मुंबईकडे कूच
अंतरवाली सराटी येथे आंदोलन होणार असल्याचे सांगत सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर मुंबईकडे कूच करण्यात येईल आणि लाखो गाड्या मुंबईत जातील, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. सरकारने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केल्याचा आरोप करत, सरकारला कुस्ती खेळायची आहे का? असा टोलाही त्यांनी लगावला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.