🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

औषधं झाली स्वस्त! २३ महत्त्वाच्या गोळ्यांचे भाव निश्चित, मेडिकल बिल होणार कमी.

औषधं झाली स्वस्त! २३ महत्त्वाच्या गोळ्यांचे भाव निश्चित, मेडिकल बिल होणार कमी.


नवी दिल्ली: तुमच्या घरात हृदयविकाराचा रुग्ण असेल, कोणाला मधुमेह असेल किंवा उच्च रक्तदाब (बीपी), नैराश्य (डिप्रेशन) अथवा चिंतेच्या (Anxiety) आजारावर उपचार सुरू असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय औषध किंमत निर्धारण प्राधिकरणाने रुग्णांना मोठा दिलासा देत 23 नवीन औषधांच्या कमाल किरकोळ किमती (Retail Price) निश्चित केल्या आहेत. या निर्णयानंतर कोणतेही मेडिकल स्टोअर किंवा औषध उत्पादक कंपनी या औषधांची विक्री निश्चित केलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने करू शकणार नाही.

अधिकृत अधिसूचनेद्वारे आदेश लागू

हा नवीन आदेश औषध किंमत नियंत्रण आदेश, 2013 (DPCO-2013) अंतर्गत अधिकृत अधिसूचना जारी करून लागू करण्यात आला आहे. NPPA ने स्पष्ट केले आहे की, जाहीर करण्यात आलेल्या किंमती जीएसटी (GST) वगळून आहेत. त्यामुळे ग्राहक औषध खरेदी करताना निश्चित किमतीवर नियमानुसार जीएसटी स्वतंत्रपणे भरावा लागेल.

औषध कंपन्यांसाठी कठोर नियम

NPPA ने सर्व औषध उत्पादक कंपन्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, या 23 औषधांची विक्री निश्चित कमाल किरकोळ किमतीपेक्षा जास्त दराने करता येणार नाही. याशिवाय पुढील 12 महिन्यांच्या आत जर एखाद्या कंपनीने याच प्रकारातील नवीन औषध बाजारात आणले तर त्या औषधाची किंमतही याच निश्चित दरमर्यादेत ठेवावी लागेल.

औषध बाजारात आणल्यानंतर एका महिन्याच्या आत संबंधित कंपनीने आवश्यक कागदपत्रे NPPA च्या पोर्टलवर सादर करणे बंधनकारक असेल. तसेच सर्व उत्पादक कंपन्यांनी नवीन किंमत यादी प्रसिद्ध करून ती NPPA आणि संबंधित राज्यांच्या औषध नियंत्रकांकडे जमा करणे आवश्यक आहे. 

जर कोणत्याही कंपनीने या आदेशाचे उल्लंघन केले किंवा ग्राहकांकडून जास्त पैसे वसूल केले तर तिच्यावर DPCO-2013 आणि आवश्यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच जादा आकारलेली रक्कम व्याजासह परत जमा करावी लागेल.



कोणत्या 23 औषधांच्या किमती निश्चित करण्यात आल्या?

1. हृदयविकार आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणासाठी औषध
किंमत: 6.37 प्रति कॅप्सूल

2. अॅटोरव्हास्टॅटिन + क्लोपिडोग्रेल + ॲस्पिरिन (20/75/75 mg)
उपयोग: हृदयविकार, कोलेस्टेरॉल नियंत्रण आणि रक्ताच्या गाठी (Blood Clot) होण्यापासून बचाव
किंमत: 8.89 प्रति कॅप्सूल

3. क्लोनाझेपाम + पॅरॉक्सेटीन (12.5 mg)
उपयोग: चिंता (Anxiety), पॅनिक डिसऑर्डर आणि नैराश्य
किंमत: 17.52 प्रति गोळी

4. क्लोनाझेपाम + पॅरॉक्सेटीन (25 mg)
उपयोग: तीव्र नैराश्य आणि चिंता
किंमत: 20.06 प्रति गोळी

5. डेसव्हेनलाफॅक्सीन (50 mg) + क्लोनाझेपाम
उपयोग: नैराश्य आणि चिंता
किंमत: 17.47 प्रति गोळी

6. डेसव्हेनलाफॅक्सीन (100 mg) + क्लोनाझेपाम
उपयोग: गंभीर नैराश्य आणि चिंता
किंमत: 25.83 प्रति गोळी

7. एस्सिटालोप्राम + क्लोनाझेपाम
उपयोग: चिंता आणि नैराश्य
किंमत: 10.72 प्रति गोळी

8. एटोरिकॉक्सिब + पॅरासिटामॉल
उपयोग: वेदना आणि सूज
किंमत: 10.90 प्रति गोळी

9. फेरस अॅस्कॉर्बेट + फॉलिक अॅसिड
उपयोग: रक्ताल्पता (अॅनिमिया)
किंमत: 16.92 प्रति गोळी

10. आयर्न + फॉलिक अॅसिड सिरप
उपयोग: महिला आणि मुलांमधील लोहाच्या कमतरतेसाठी
किंमत: 0.28 प्रति मिलिलिटर

11. मायो-इनोसिटॉल + डी-चायरो इनोसिटॉल + व्हिटॅमिन D3
उपयोग: पीसीओएस (PCOS) आणि महिलांच्या प्रजनन आरोग्यासाठी
किंमत: 9.29 प्रति ग्रॅम

12. ऑफ्लॉक्सासिन + मेट्रोनिडाझोल सस्पेन्शन (100/200 mg)
उपयोग: जिवाणूजन्य आणि पोटातील संसर्ग
किंमत: 1.09 प्रति मिलिलिटर

13. ऑफ्लॉक्सासिन + मेट्रोनिडाझोल सस्पेन्शन (50/100 mg) .

उपयोग: मुलांमधील संसर्ग
किंमत: 0.86 प्रति मिलिलिटर

14. पॅरासिटामॉल ओरल सस्पेन्शन
उपयोग: ताप आणि वेदना
किंमत: 0.66 प्रति मिलिलिटर

15. टेल्मिसार्टन + मेटोप्रोलोल (25 mg)
उपयोग: उच्च रक्तदाब
किंमत: 15.01 प्रति गोळी

16. टेल्मिसार्टन + मेटोप्रोलोल (50 mg)
उपयोग: उच्च रक्तदाब आणि हृदयविकार
किंमत: 18.50 प्रति गोळी

17. टेल्मिसार्टन + क्लोर्थालिडोन + मेटोप्रोलोल (50 mg)
उपयोग: नियंत्रणात न येणारा उच्च रक्तदाब
किंमत: 11.77 प्रति गोळी

18. टेल्मिसार्टन + क्लोर्थालिडोन + मेटोप्रोलोल (25 mg)
उपयोग: उच्च रक्तदाब
किंमत: 11.67 प्रति गोळी

19. नेबिवोलोल + टेल्मिसार्टन
उपयोग: उच्च रक्तदाब
किंमत: 13.70 प्रति गोळी

20. सिटाग्लिप्टिन + ग्लायमेपिराइड + मेटफॉर्मिन (1000 mg + 2 mg)
उपयोग: टाइप-2 मधुमेह
किंमत: 19.46 प्रति गोळी

21. सिटाग्लिप्टिन + ग्लायमेपिराइड + मेटफॉर्मिन (1000 mg + 1 mg)
उपयोग: टाइप-2 मधुमेह
किंमत: 17.73 प्रति गोळी

22. क्लॅरिथ्रोमायसिन + पँटोप्राझोल + अमॉक्सिसिलिन कॉम्बी किट
उपयोग: Helicobacter pylori संसर्ग आणि पोटातील अल्सर
किंमत: 122.56 प्रति किट

23. डापाग्लिफ्लोजिन + पायोग्लिटाझोन + मेटफॉर्मिन SR
उपयोग: टाइप-2 मधुमेहामध्ये रक्तातील साखर नियंत्रण
किंमत: 18.77 प्रति गोळी

सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा निर्णय

मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या दीर्घकालीन (Chronic) आजारांनी ग्रस्त रुग्णांना दरमहा औषधांवर हजारो रुपये खर्च करावे लागतात. अशा परिस्थितीत NPPA च्या या निर्णयामुळे औषधांच्या मनमानी दरांवर नियंत्रण येणार असून रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आवश्यक औषधे अधिक परवडणाऱ्या दरात उपलब्ध होतील आणि ग्राहकांना जादा किंमत मोजावी लागणार नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.