कल्याण डोंबिवलीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिंदे सेनेत यांच्यातील अंतर्गत वाद आणखी तीव्र होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटातील काही पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अर्चित खडकूल यांनी आपल्या जुन्या पक्षावर गंभीर आरोप केले. शिवसेनेत आम्हाला योग्य वेळी पद देण्यात आले नाही. पक्षासाठी काम करूनही आम्हाला सातत्याने डावलण्यात आले. एवढेच नाही, तर आमच्या एका पदाधिकाऱ्याला शिंदे गटाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने बैठकीतून हाकलून लावले. त्यामुळे आम्ही नाराज होतो आणि अखेर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असा आरोप खडकूल यांनी केला. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही शिवसेना शिंदे गटावर अप्रत्यक्ष टीका करत, आमची चाल कासवासारखी असली तरी शेवटी विजय आमचाच होणार असा दावा केला. या विधानामुळे महायुतीतील दोन्ही पक्षांमधील शाब्दिक संघर्ष अधिकच तीव्र झाल्याचे चित्र दिसत होते. महापालिका निवडणुका जवळ येत असताना दोन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे परस्पर पक्षांतर सुरू असल्याने महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.