सांगली : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभरात मोठ्या उत्साहाचे वातावरण असतानाच सांगलीमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे उर्फ भिडे गुरुजी हे पुन्हा एकदा वादातसापडले आहेत. 'हिंदुस्थानचा ध्वज भगवाचं' असल्याचे पोस्टर्स हातात घेऊन सांगली शहरात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने 'हिंदवी स्वातंत्र्य दिन' पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या पदयात्रेत मोठ्या संख्येने धारकरी सहभागी झाले होते.
पदयात्रेत सहभागी धारकऱ्यांच्या हातात भगवे ध्वज दिसून आले. याशिवाय भारतमातेची प्रतिमा, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमाही हातात घेण्यात आल्या होत्या. काही धारकऱ्यांकडे बाळासाहेब ठाकरे यांचे फोटोही पाहायला मिळाले. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच राष्ट्रध्वजाचा खुलेआम अपमान झाल्याचे निदर्शनास येत असून यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.
अखंड हिंदुस्थानचे स्वप्न हा पदयात्रेचा उद्देश - शिवप्रतिष्ठाण
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, अखंड भारताच्या संकल्पनेचा प्रचार करण्याच्या उद्देशाने ही पदयात्रा काढण्यात आली. स्वातंत्र्यानंतर अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पुढे नेण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे. दरम्यान, या पदयात्रेशी संबंधित एक पोस्टर सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. या पोस्टरमधील मजकुरावरून राष्ट्रध्वज आणि भगव्या ध्वजाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काँग्रेसकडून संभाजी भिडेंवर निशाणा
या पदयात्रेवरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी संभाजी भिडे यांच्यावर टीका केली. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच राष्ट्रध्वजाचा अवमान केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. वंदे मातरमच्या कथित अवमानाबाबत कारवाईची भूमिका घेतली जाते, तर राष्ट्रध्वजाच्या कथित अवमानाबाबत वेगळी भूमिका का, असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला.आपल्या अधिकृत 'X' अकाऊंटवरून पोस्ट करत सचिन सावंत म्हणाले, 'स्वातंत्र्यादिनाच्या दिवशी मनोहर भिडे राष्ट्रध्वजाचा खुलेआम अपमान करतो. वंदेमातरमचा अपमान झाला तर शिक्षा आहे मग राष्ट्रध्वजाचा अवमान कसा खपवून घेतला जाऊ शकतो? ५२ वर्षे आपल्या कार्यालयावर तिरंगा न फडकावणाऱ्यांना आता तिरंगा यात्रा काढावीशी वाटली. पण भिडेवर गुन्हा दाखल करणार का? हा आमचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे. तशी आमची मागणी ही आहे,' असे ते म्हणाले.
भाजपकडून तिरंग्याबाबत स्पष्ट भूमिका
दुसरीकडे, भाजप नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली. कोण काय म्हणते याला महत्त्व नसून तिरंगा हाच भारताचा राष्ट्रध्वज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. भगवा हा हिंदू समाजाचा स्वाभिमान असल्याचे सांगतानाच देशाचा अधिकृत राष्ट्रध्वज तिरंगाच असल्याचे गोरे यांनी नमूद केले. त्यामुळे सांगलीतील या पदयात्रेनंतर भगवा ध्वज, राष्ट्रध्वज आणि अखंड हिंदुस्थानच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.