सांगली :- सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) घरफोडीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास करत आरोपी पुतण्याला अटक केली आहे. चुलत्याच्याच घरातील तब्बल ८ लाख ८१ हजार २९० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या आरोपीला एलसीबीच्या पथकाने अवघ्या काही दिवसांत जाळ्यात ओढले. प्रशांत चिन्नाप्पा घेज्जी (वय ३०, रा. डोणीपिर वस्ती, बिळूर, ता. जत) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
घटनेची पार्श्वभूमी
बिळूर (ता. जत) येथील रहिवासी रावसाहेब बाबू घेज्जी (वय ४९) यांच्या घरी २३ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास कोणी नसताना अज्ञात चोराने घरातील किचन रूममधील स्टीलच्या डब्यात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी २४ जुलै रोजी जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता (गु.र.नं. ४१७/२०२६, बी.एन.एस. कलम ३०५ (अ), ३३१ (३)). मा. पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी आणि मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बाखकर यांनी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव व पथक तपास करत होते.तपासादरम्यान, ११ ऑगस्ट २०२६ रोजी पोलीस अंमलदार केरुबा चव्हाण यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, संशयित प्रशांत घेज्जी हा जत-कवठेमहांकाळ रस्त्यावरील जाधव वस्ती येथील बंद हॉटेल सानिया गार्डनजवळ सोन्या-चांदीचे दागिने विक्रीसाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ हॉटेल सानिया गार्डन परिसरात सापळा रचला. तेथे संशयास्पद स्थितीत थांबलेल्या प्रशांत घेज्जी याला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेण्यात आले.
चुलत्याच्याच घरात केली होती चोरी
पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीमध्ये आरोपीच्या पॅन्टच्या खिशात सोन्याच्या चैनी, झुमके, पट्टी, अंगठी, गंठण आणि चांदीची अंगठी मिळून आली. दागिन्यांबाबत सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवत विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपल्याच चुलत्याच्या (रावसाहेब घेज्जी) घरात कडी काढून आत प्रवेश करत चोरी केल्याची कबुली दिली. तसेच चोरीतील रोख रक्कम स्वतःच्या खर्चासाठी वापरल्याचे सांगितले.
जप्त मुद्देमाल आणि न्यायालयीन कोठडी
पोलिसांनी आरोपीकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे:सोन्याचे दागिने: ८० ग्रॅम वजनाचे (किंमत ₹८,७८,७९०/-)चांदीचे दागिने: ०५ ग्रॅम वजनाचे (किंमत ₹२,५००/-)एकूण जप्त मुद्देमाल: ₹८,८१,२९०/- (आठ लाख एक्याऐंशी हजार दोनशे नव्वद रुपये)आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी जत पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बाखकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहा. पो. नि. राजेंद्र यादव, पोलीस अंमलदार संदीप पाटील, अतुल माने, मच्छिंद्र बर्डे, रणजीत जाधव, मोतीराम खोत, केरुबा चव्हाण, अभिजीत माळकर तसेच सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे आणि विजय पाटणकर यांच्या पथकाने केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.