🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुरुंगातही व्यभिचार! माजी खासदार Prajwal Revanna च्या फोनमध्ये सापडले 90 अश्लील Video, कोठडीत मोबाईल अन् पेन ड्राईव्ह कसा गेला?

तुरुंगातही व्यभिचार! माजी खासदार Prajwal Revanna च्या फोनमध्ये सापडले 90 अश्लील Video, कोठडीत मोबाईल अन् पेन ड्राईव्ह कसा गेला?


कर्नाटकातील हसनचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. बंगळूरमधील परप्पना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या रेवण्णाच्या कोठडीवर अचानक छापा टाकण्यात आला.

या कारवाईत एक मोबाईल फोन, चार्जर, पेन ड्राईव्ह आणि पॉकेट नोटबुक जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या स्मार्टफोनच्या तपासणीत तब्बल ८० ते ९० अश्लील व्हिडिओ आढळल्याचे समोर आले आहे. या प्रकारानंतर कारागृह प्रशासनात खळबळ उडाली असून, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी एका सहायक अधीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

छाप्यात मोबाईलसह विविध साहित्य जप्त

केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) मंगळवारी दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत कारागृहातील हाय-प्रोफाईल कैद्यांच्या बराकींची तपासणी केली. सीसीबी निरीक्षक एम. एल. सुब्रमण्यम स्वामी यांच्या तक्रारीवरून दाखल झालेल्या एफआयआरमध्ये या कारवाईची माहिती देण्यात आली आहे. 
पॉक्सो कायद्यातील आरोपी तसेच विचाराधीन कैदी प्रज्वल रेवण्णा आणि प्रताप राय यांना सुरक्षा विभाग ३ मधील खोली क्रमांक ४ मध्ये एकत्र ठेवण्यात आले होते. झडतीदरम्यान फिकट निळ्या रंगाचा रेडमी स्मार्टफोन, पांढरा चार्जर, काळ्या रंगाचा सॅनडिस्क पेन ड्राईव्ह आणि निळ्या रंगाची पॉकेट नोटबुक मिळाली.
चौकशीत रेवण्णाने केवळ निळी डायरी आपली असल्याचे सांगितले. तर मोबाईल, चार्जर आणि पेन ड्राईव्ह प्रताप रायचे असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, रेवण्णाने प्रतापच्या फोनचा वापर नातेवाईक तसेच वकिलाशी संपर्क साधण्यासाठी केल्याचे मान्य केले.

फोनमध्ये अश्लील व्हिडिओ, वर्तमानपत्रांच्या कात्रणांसह अनेक ॲप्स जप्त केलेल्या फोनची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये ८० ते ९० पॉर्नोग्राफिक व्हिडिओ डाउनलोड केलेले असल्याचे आढळले. यातील बहुतांश व्हिडिओ भारतीय पॉर्नोग्राफीचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय आक्षेपार्ह कपड्यांमधील महिलांची काही वर्तमानपत्रातील कात्रणेही फोनमध्ये सेव्ह असल्याचे तपासात समोर आले.

स्मार्टफोनमध्ये फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, नेटफ्लिक्स आणि प्राईम व्हिडिओ यांसारखे ॲप्सही होते. हे ॲप्स पासवर्डने सुरक्षित करण्यात आले होते. चौकशीदरम्यान दोन्ही कैद्यांनी या ॲप्सचे पासवर्ड माहिती असल्याचे नाकारले.

या व्हिडिओंची निर्मिती किंवा डाउनलोड कधी झाले आणि त्यांचा रेवण्णाविरोधातील यापूर्वीच्या प्रकरणांशी काही संबंध आहे का, हे तपासण्यासाठी मोबाईलसह इतर डिजिटल उपकरणे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत.
कारागृह अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

परप्पना अग्रहारा कारागृहासारख्या अतिसुरक्षित ठिकाणी स्मार्टफोनचा वापर आणि व्हीआयपी कैद्यांना मिळणाऱ्या सुविधांबाबत या घटनेमुळे प्रश्न निर्माण झाले आहेत. कारागृह महासंचालक (डीजी) आलोक कुमार यांनी सहायक अधीक्षक इरन्ना रंगपूर यांना तातडीने निलंबित केल्याची माहिती दिली. बंगळूरु मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

सीसीबीच्या तक्रारीनंतर परप्पना अग्रहारा पोलीस ठाण्यात प्रज्वल रेवण्णा आणि प्रताप राय यांच्याविरोधात कर्नाटक तुरुंग कायदा २०२२ मधील कलम ४२ आणि बीएनएसच्या कलम ३२३ अंतर्गत स्वतंत्र एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

ऑगस्ट २०२५ मध्ये जन्मठेपेची शिक्षा
वारंवार लैंगिक अत्याचार आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने ऑगस्ट २०२५ मध्ये प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर रेवण्णाने शिक्षेला स्थगिती तसेच अंतरिम जामिनासाठी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, त्याची सुटका झाल्यास साक्षीदारांवर आणि प्रलंबित खटल्यांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे कारण देत उच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.