पुसद : महावितरणच्या ब्रेकडाऊन व मेंटेनन्सच्या कामांच्या बिलांची रक्कम मंजूर करून देण्यासाठी चार लाख रुपयांची लाच स्वीकारताना पुसद येथील महावितरणचा कार्यकारी अभियंता जनार्दन लालू चव्हाण (वय ५७) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती पथकाने शुक्रवारी (दि.१४) सायंकाळी रंगेहात पकडले. विद्युत भवनातील कार्यकारी अभियंत्यांच्या क्वार्टरमध्ये ही कारवाई करण्यात आली.
एसीबीकडे दाखल तक्रारीनुसार, तक्रारदार कंत्राटदाराला महावितरणच्या पुसद उपविभागांतर्गत ब्रेकडाऊन व मेंटेनन्सची सुमारे २० लाख रुपये किमतीची नऊ कामांची वर्कऑर्डर देण्यात आली होती. या कामांची बिले मंजूर करून देयकाची रक्कम मिळवून देण्यासाठी कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी एकूण रकमेच्या २० टक्के दराने चार लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने १४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास कार्यकारी अभियंत्यांच्या क्वार्टरमध्ये तक्रारीची पडताळणी केली. त्यावेळी चार लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून ती सायंकाळी स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. शुक्रवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास विद्युत भवनातील क्वार्टरमध्ये तक्रारदाराकडून चार लाख रुपयांची लाच स्वीकारताना जनार्दन चव्हाण याला पथकाने रंगेहात पकडले. त्याला ताब्यात घेण्यात आले असून, पुसद शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, आरोपीच्या निवासस्थानी घरझडतीची कारवाईही सुरू होती.ही कारवाई पोलिस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली, पर्यवेक्षक अधिकारी पोलिस उपअधीक्षक राजेश राठोड यांच्या देखरेखीखाली पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली. पथकात पोलिस उपअधीक्षक मंजुषा भोसले, पोलिस निरीक्षक रविंद्र सहारे, पोलिस अंमलदार अभय वाघ, वैभव जायले, मोहन ठाणेकर, राजेश बहिरट, उमेश बुजाडे आणि वाहनचालक यांचा समावेश होता.
भ्रष्टाचाराची माहिती देण्याचे आवाहन
लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध नागरिकांनी न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन एसीबीने केले आहे. अमरावती येथील एसीबी कार्यालयाशी ०७२१-२५५३०५५ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा १०६४ या हेल्पलाइनवर संपर्क साधता येणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.