कुपवाड दुहेरी हत्याकांड: आरोपीला तातडीने फाशी द्या अन् दोन्ही चिमुकल्यांचे पालकत्व सरकारने स्वीकारा!
समितकदम यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांना निवेदन; केसरकर कुटुंबातील मुलांच्या भविष्यासाठी जनस्वराज्य पक्षाची आक्रमक मागणी
सांगली :=कुपवाड येथील विघ्नहर्ता कॉलनीमध्ये १५ ऑगस्ट रोजी घडलेल्या नराधम हत्याकांडाने संपूर्ण सांगली जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेत केसरकर दाम्पत्याची निर्घृण हत्या झाल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांची दोन लहान मुले पूर्णपणे उघड्यावर पडली आहेत. या पीडित चिमुकल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या भविष्याची जबाबदारी शासनाने घ्यावी, या मागणीसाठी जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित (दादा) कदम यांच्या नेतृत्वात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तातडीने निवेदन देण्यात आले.
आरोपीला फाशी अन् मुलांच्या शिक्षणाचा खर्च शासनाने करावा
१५ ऑगस्टच्या सुमारास घडलेल्या या दुर्दैवी घटनेत आधी पत्नीचा आणि त्यानंतर पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपीला कडक कलमांखाली खटला चालवून तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मुख्य मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
त्याचबरोबर, आई-वडिलांचे छत्र हरपल्याने अनाथ झालेल्या दोन्ही निष्पाप मुलांचे पालकत्व शासनाने स्वीकारावे, त्यांना शासनाने दत्तक घेऊन त्यांच्या संपूर्ण शिक्षणाचा आणि भविष्यातील सर्व पुनर्वसनाचा खर्च राज्य सरकारने उचलावा, अशी आग्रही विनंती समित कदम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
स्थानिक लोकप्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती
या गंभीर प्रसंगी पीडित मुलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत, जनस्वराज्य पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. निवेदन देताना जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यासोबत नगरसेवक युवराज गायकवाड, नगरसेवक सुरेश बंडगर आणि नगरसेवक दीपक वायदंडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.