प्रेयसीसाठी फोडला MPSC चा पेपर? पेपरफुटी प्रकरणात लव्ह स्टोरीचा ट्विस्ट; तपासात काय आलं समोर?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. या पेपरफुटीमागे एका प्रेमकहाणीचा अँगल असल्याची माहिती तपासातून समोर येत असल्याचे समोर आले आहे.
एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला परीक्षेत मदत करण्याच्या उद्देशाने आयोगातील एका कर्मचाऱ्याशी संधान साधून प्रश्नपत्रिका मिळवल्याची माहिती समोर आहे.
माहितीनुसार, या प्रकरणात आयोगातील एका कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्याशी संबंधित व्यक्तीने संपर्क साधल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर औषध निरीक्षक परीक्षेची गोपनीय प्रश्नपत्रिका बाहेर गेल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे, फुटलेला पेपर मोठ्या प्रमाणावर वितरित न होता केवळ एका विद्यार्थ्यापर्यंतच पोहोचल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणात प्रेमसंबंधातून पेपर मिळवून देण्याचा कथित प्रयत्न झाला का, यासह पेपरफुटीच्या संपूर्ण साखळीचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या लव्ह स्टोरीमागील नेमके सत्य आणि या प्रकरणातील संबंधितांची भूमिका स्पष्ट होणार आहे. दरम्यान, झालेल्या कथित गैरप्रकारामुळे हजारो उमेदवारांचे नुकसान झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. MPSC आणि पोलिसांच्या पुढील तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द
या परीक्षेत पेपर फुटी झाल्याच्या मुंबई पोलिसांच्या अहवालानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या पदांसाठी फेरपरीक्षा घेण्यात येणार असून संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच फेरपरीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. फेरपरीक्षेची तारीख व अन्य तपशील स्वतंत्र प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात येणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.