पुणे :-दररोज ₹५०० च्या परताव्याचं आमिष आणि थेट ३३ लाखांचा गंडा, पुण्यातील डॉक्टर-व्यापारी पती-पत्नीचा कारनामा
आर्थिक गुंतवणुकीवर दररोज आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून तब्बल ६ जणांची ३३ लाख ४४ हजार ४२५ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार आळंदी परिसरात उघडकीस आला आहे.
लोकांचा विश्वास संपादन करून फसवणूक केल्याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात भागवत गंगाधर पऱ्हाड आणि धनश्री भागवत पऱ्हाड या पती-पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी २०२४ ते ऑगस्ट २०२६ दरम्यान धानोरे फाटा येथे हा सर्व प्रकार घडला असून, चऱ्होली खुर्द येथील रहिवासी राहुल भोलेनाथ भोसले यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी धनश्री पऱ्हाड हिचे धानोरे फाटा येथे 'चिरायू क्लिनिक' नावाचे दवाखाना असून पती भागवत याचे 'श्रीभा कलेक्शन' नावाचे कपड्यांचे दुकान होते. शेजारीच मोबाईल शॉपी असलेल्या राहुल भोसले यांच्याशी त्यांची ओळख झाली. एका ओळखीच्या सोनाराकडे १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दररोज ५०० रुपये परतावा मिळवून देण्याचे आमिष पऱ्हाड दांपत्याने दाखवले.
सुरुवातीला काही दिवस परतावा देऊन विश्वास संपादन केल्यानंतर आरोपींनी परतावा देणे बंद केले. जेव्हा तक्रारदारांनी आपली मूळ गुंतवणुकीची रक्कम परत मागितली, तेव्हा पऱ्हाड पती-पत्नीने टाळाटाळ करत "पैसे मागितल्यास विनयभंगाची खोटी केस टाकू," अशी धमकी दिली. अखेर फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलिसांत धाव घेतली.
आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी धनश्री भागवत पऱ्हाड आणि भागवत गंगाधर पऱ्हाड यांनी गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून खालील व्यक्तींकडून एकूण ३३ लाख ४४ हजार ४२५ रुपये गोळा केले
राहुल भोसले व त्यांचे भाऊ गौरव भोसले: ₹१५,७४,४२५
यशवंत सुनील गावडे (बांधकाम व्यावसायिक, धानोरे): ₹१०,००,०००
शुभम बाळासाहेब लोखंडे व मोनिका बाळासाहेब लोखंडे (धानोरे): ₹६,००,०००
योगेश ज्ञानेश्वर वंजारी (चऱ्होली खुर्द): ₹१,७०,०००
आरोपींनी "१ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दररोज ५०० रुपये परतावा दिला जाईल; मात्र शनिवार, रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवशी परतावा मिळणार नाही," या अटीवर जादा परताव्याचे आमिष दाखवले होते. अशा प्रकारे लोकांचा विश्वास संपादन करून त्यांचा विश्वासघात करत आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आळंदी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.