🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​'मी लिंबू कापला अन् पाऊस थांबला!' भाजप खासदार भोजराज नाग यांचा अजब दावा; अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या वक्तव्याने नवा वाद

'मी लिंबू कापला अन् पाऊस थांबला!' भाजप खासदार भोजराज नाग यांचा अजब दावा; अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या वक्तव्याने नवा वाद


रायपूर :- पाऊस थांबवण्यासाठी किंवा पाडण्यासाठी वैज्ञानिक पद्धती आणि हवामान खात्याच्या अंदाजांवर जग विश्वास ठेवत असतानाच, लोकप्रतिनिधींकडून मात्र अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी विधाने समोर येत आहेत. छत्तीसगडमधील कांकेर मतदारसंघाचे भाजप खासदार भोजराज नाग यांनी असाच एक अजब आणि हास्यास्पद दावा करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. "मी महादेवाकडे प्रार्थना करून लिंबू कापला आणि अचानक पडणारा मुसळधार पाऊस थांबला," असे वक्तव्य त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात केले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, एका स्थानिक कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री येणार होते. मात्र, त्यापूर्वी अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन मुसळधार पाऊस सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यावर बोलताना खासदार भोजराज नाग म्हणाले, "मुख्यमंत्री इथे येणार होते, पण मला कळले की हवामान खूप खराब झाले आहे आणि जोरदार पाऊस होणार आहे. आयोजनात विघ्न येऊ नये म्हणून मी तात्काळ महादेवाचे स्मरण केले, प्रार्थना केली आणि एक लिंबू कापला. त्यानंतर आश्चर्यकारकपणे पाऊस थांबला आणि कार्यक्रम सुरळीत पार पडला." ​खासदरांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नागरिकांमधून आणि सामाजिक कार्यकर्त्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समिती व विरोधकांचा घणाघात
एकीकडे देश २१ व्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर नवनवे टप्पे गाठत असताना, जबाबदार पदावर बसलेल्या खासदाराने 'लिंबू कापून पाऊस घालवल्याचा' दावा करावा याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदे आणि जनजागृती केली जात असताना, अशा प्रकारची विधाने समाजाला मागासलेपणाकडे ढकलणारी आहेत, अशी टीका विरोधकांनी केली आहे.

​"हवामानात होणारे बदल हे नैसर्गिक आणि वैज्ञानिक कारणांमुळे होतात. एका लिंबामुळे पाऊस थांबत असेल, तर हवामान खाते आणि करोडो रुपयांची यंत्रणा कशासाठी?" असा सवाल उपस्थित करत अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांनी खासदारांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. ​या वक्तव्यामुळे भाजप खासदार पुन्हा एकदा अडचणीत आले असून, वैज्ञानिक दृष्टिकोन जपण्याऐवजी भ्रामक समजांना खतपाणी घातल्याबद्दल त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.