शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि पेपरफुटीच्या मुद्दय़ावरून भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'अटलबिहारी वाजपेयींच्या कार्यकाळात पेपर का फुटत नव्हते, याचा अभ्यास करण्याची गरज आहे,' अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारचे कान टोचले. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतून त्यांनी देशातील सध्याच्या शिक्षणाच्या स्थितीवर परखड भाष्य केले. 'तत्त्वांचे राजकारण राहिलेले नाही.
वाजपेयींच्या काळात असे नव्हते. आज प्रत्येक ठिकाणी पैशाचा बोलबाला आहे. बँका आणि उद्योगांमध्ये घोटाळे होत आहेत. शिक्षकांच्या नियुक्त्या लाच घेऊन केल्या जात आहेत. सरकार स्वतःच अनेक घोटाळय़ांत अडकले आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत असून तेही चुकीच्या मार्गाचा वापर करत आहेत,' असे मुरली मनोहर जोशी म्हणाले. 'पेपरफुटी रोखण्यासाठी विमाने, लष्कर आणि सुरक्षा यंत्रणाचा वापर करण्याच्या नव्या कल्पनांवरही त्यांनी टीका केली. 'परीक्षा नव्हे तर एखादे युद्धच पेटल्यासारखे वाटते', असा टोला त्यांनी हाणला.
फक्त रस्ते बनवणे हा विकास नाही!
'शिक्षण आणि आरोग्यावरील खर्चात सातत्याने कपात होत आहे. रस्ते आणि पायाभूत सुविधांवर खर्च वाढवला जात आहे. फक्त रस्ते बनवणे हा विकास नसतो. रस्त्यांसाठी इंजिनीअर आणि मशीन लागतात. त्यासाठी शिक्षण व्यवस्था मजबूत असणे गरजेचे आहे,' असे ते म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.