सांगली :-सांगली शहर आणि परिसरात घरफोडी व चोरीचे सत्र चालवणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने (DB टीम) बेड्या ठोकल्या आहेत. पवन प्रकाश पवार (वय ३१, रा. भारत चौक, खणभाग, सांगली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून २९ ग्रॅम सोन्याचे आणि ३३९ ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहर पोलीस ठाण्यातील तब्बल ४ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
स्टेशन चौक परिसरात रचला सापळा
सांगली शहर हद्दीतील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांनी दिले होते. त्याअनुषंगाने सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक गस्त घालत होते.
२९ ऑगस्ट २०२६ रोजी पोलीस अंमलदार संदीप पाटील व सचिन तिवडे यांना खास बातमीदारांमार्फत गोपनीय माहिती मिळाली की, संशयित पवन पवार हा घरफोडीतील चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी स्टेशन चौक परिसरात येणार आहे. पथकाने तात्काळ स्टेशन चौक परिसरात सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सोन्या-चांदीचे दागिने मिळून आले.
आकाशवाणी केंद्र परिसर व हरिपूर रस्त्यावर घरफोड्या
पोलीस कोठडीत आरोपीकडे कसून चौकशी केली असता, त्याने सांगलीतील आकाशवाणी केंद्राच्या पाठीमागील एक बंद घर, तसेच हरिपूर रोडवरील काळीवाट साई मंदिर परिसरातील घरात कुलूप तोडून चोऱ्या केल्याची कबुली दिली. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या क्राईम रेकॉर्डची पडताळणी केली असता त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (अ) व ३३१ (४) अन्वये गु.र.नं. ३५/२०२६, ८०/२०२६, १९९/२०२६ आणि २३६/२०२६ असे एकूण ४ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
जप्त केलेला मुद्देमाल
सुवर्णालंकार (२९ ग्रॅम): सोन्याची नाणी, अंगठ्या, बदाम, लहान बाळाच्या अंगठ्या, देवीचे मंगळसूत्र, सोन्याची नथ आणि सोन्याच्या कॅप (अंदाजे किंमत ₹१,२३,०००/-).
रजत अलंकार (३३९ ग्रॅम): चांदीचा मुखवटा, वाट्या, बाळाचा करदोडा, पैंजण, मनगट्या, देवीचा मुकुट, केवड्याची पाने, लिंग, कंबरपट्टा आणि चांदीचे हात (अंदाजे किंमत ₹१,७२,०००/-).
कारवाई करणारे पोलीस पथक
ही कारवाई पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष यादव, पोलीस अंमलदार संदीप पाटील, सचिन तिवडे, विनायक शिंदे, सतीश लिंबळे, गौतम कांबळे, संतोष गळवे, शंकर रणधीर, डिसले, गणेश कांबळे, गणेश कोळेकर, अभिषेक वाडकर आणि दिग्विजय साळुंखे यांच्या पथकाने केली. आरोपी पवन पवार याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.