दिल्ली: राजधानी दिल्लीत १४ वर्षांपूर्वी घडलेल्या काळ्या-कुट्ट निर्भया प्रकरणाच्या भीषण आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. ग्रेटर नोएडा ते कश्मीरी गेट दरम्यान एका चालत्या स्लीपर बसमध्ये १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर चालक आणि कंडक्टरने सामूहिक बलात्कार केल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना ४ ऑगस्ट रोजी घडली असून, कश्मीरी गेट पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याशिवाय, या प्रकरणात गुन्हा घडलेली बस जप्त केली आहे.
आईच्या रागावण्यामुळे घर सोडले, अन्...
समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी मूळची उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी आहे. ती सध्या ११ वीमध्ये शिकत आहे. अभ्यासावरून आई रागावल्याने तिने रागाच्या भरात घर सोडण्याचे ठरवले. तिने ४ ऑगस्ट रोजी कोणालाही न सांगता घरातून निघून गेली. नोएडा सेक्टर-६३ येथे राहणाऱ्या आपल्या चुलत भावाकडे जाण्यासाठी ती बसमध्ये बसली. मात्र, नोएडामध्ये मुसळधार पाऊस आणि अंधार असल्यामुळे ती चुकीने परी चौक येथे उतरली.
एकटी मुलगी, रिकामी बस अन् नराधमांचा कट...
परी चौक येथे एकीकडे एक स्लीपर बस येताना दिसल्याने तिने बस थांबवून सेक्टर-६३ ला जाते का, अशी चौकशी केली. कंडक्टरने 'हो' असे सांगून तिला आत बसवले. बसमध्ये एकही प्रवासी नव्हता. ही बस तांत्रिक बिघाडामुळे ग्रेटर नोएडातील सूरजपूर येथील वर्कशॉपमध्ये दुरुस्तीसाठी गेली होती. तेथून दुरुस्ती करून चालक कुलदीप आणि कंडक्टर संदीप रिकामी बस घेऊन उत्तर दिल्लीतील तिमारपूर पार्किंगकडे परतत होते. मुलीला एकटे पाहून दोघांची नियत फिरली आणि त्यांनी तिच्यावर अत्याचार केला.
४७ किलोमीटरच्या प्रवासात क्रूरता...
बस सुरू झाल्यानंतर काही वेळातच कंडक्टरने तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चालक कुलदीप आणि कंडक्टर संदीप या दोघांनी चालत्या बसमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिने प्रतिकार केला असता तिला जीवे मारण्याची धमकी दिली. उशिरा रात्री दिल्लीत पोहोचल्यानंतर नराधमांनी तिला कश्मीरी गेट बस स्थानकाजवळील रिंग रोडवर सोडून पळ काढला आणि तिमारपूर पार्किंगमध्ये जाऊन आरामात झोपले.
पडदे लावलेली बस अन् प्रशासनाचा निष्काळजीपणा
परी चौक ते कश्मीरी गेट या ४७ किलोमीटरच्या प्रवासादरम्यान बसच्या खिडक्यांवर जाड पडदे लावलेले होते. त्यामुळे आत काय चालले आहे हे बाहेरून कोणालाही दिसत नव्हते. नियम डावलून एवढ्या लांब पल्ल्यात बस धावत असताना एकाही पोलिसांच्या नाकेबंदीवर बसची तपासणी झाली नाही. महामार्ग आणि रिंग रोडवर बॅरिकेड्स लावल्यास वाहतूक कोंडी होते, असा अजब दावा पोलिसांनी केला आहे. २०१२ च्या निर्भया कांडानंतर ठरवलेले सुरक्षेचे कडक नियम आजही फक्त कागदावरच असल्याचे या घटनेने पुन्हा सिद्ध केले आहे.
सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींना ठोकल्या बेड्या
कश्मीरी गेटवर रस्त्यावर फेकल्यानंतर पीडित मुलीने कश्मीरी गेट पोलिसांकडे धाव घेऊन घडलेला प्रसंग सांगितला. पोलिसांनी तात्काळ वैद्यकीय तपासणी करून तिचा जबाब नोंदवला आणि सामूहिक बलात्कार, अपहरण व मारहाणीच्या कलमांखाली एफआयआर (FIR) नोंदवला. एसीपी शंकर बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन्ही आरोपींचा माग काढत तिमारपूर पार्किंगमधून कुलदीप आणि संदीपच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांकडून तपासाला वेग, डीएनए चाचणी होणार
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पीडितेच्या पालकांना दिल्लीत बोलावून घेतले. महिला पोलिसांच्या देखरेखीत तिची समुपदेशन करून सुरक्षितपणे पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी दोन्ही आरोपींची वैद्यकीय चाचणी केली आहे. तसेच फॉरेन्सिक टीमने बसमधून पीडितेचे केस आणि इतर जैविक पुरावे गोळा केले आहेत. हे पुरावे आणि पीडितेच्या रक्ताचे नमुने यांचे डीएनए मॅचिंग केले जाणार आहे, जेणेकरून न्यायालयात भक्कम पुरावे सादर करता येतील, अशी माहिती समोर आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.