🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शाळेची फी १४ लाख, बससाठी ३ लाख अन् युनिफॉर्मचे २६ हजार; मुलीच्या शिक्षणाचा वार्षिक खर्च पाहून जाल चक्रावून, महिलेचा व्हिडीओ व्हायरल

शाळेची फी १४ लाख, बससाठी ३ लाख अन् युनिफॉर्मचे २६ हजार; मुलीच्या शिक्षणाचा वार्षिक खर्च पाहून जाल चक्रावून, महिलेचा व्हिडीओ व्हायरल


दुबईतील एका आंतरराष्ट्रीय शाळेचा वार्षिक शिक्षण खर्च जवळपास १७ ते १८ लाख रुपये आहे असा अनुभव सांगणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या खर्चावर सोशल मीडियावर नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, आपल्याला ज्या सोयी-सुविधा मिळाल्या नाहीत, त्या आपल्या मुलांना मिळाव्यात, अशी स्वप्नं प्रत्येक आई-वडील पाहतात. अन् मग अगदी ग्रामपंचायतीच्या शाळेत शिकलेले पालकसुद्धा आपल्या मुलांना आंतरराष्ट्रीय शाळेत घालतात. 

पण जितकी मोठी शाळा, तितकी जास्त फी. अन् एक वेळ अशी येते, जेव्हा हा खर्च पालकांना सांभाळणं कठीण होतं. अशाच एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दुबईमध्ये राहणाऱ्या या महिलेने आपल्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च सांगितला. या खर्चाचे आकडे पाहून तुमचं डोकंसुद्धा चक्रावून जाईल. शिक्षण हे खूप महाग होत चाललं आहे, अशी चर्चा आपण सर्वत्र ऐकतो. पण या महागाईचे आकडे हे खरंच सामान्य माणसाला पार चक्रावून टाकणारे आहेत.शाळेचा खर्च किती आहे?​

हा व्हिडीओ nika.indubai या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही दुबईत राहणाऱ्या वेरोनिका नावाच्या महिलेला पाहू शकता. तिची मुलगी दुबईतील एका आंतरराष्ट्रीय शाळेत शिकतेय. अन् या शाळेमध्ये असेसमेंट फी १३ हजार रुपये, ॲन्युअल ट्युशन फी १४.३४ लाख रुपये, युनिफॉर्मसाठी २६ हजार रुपये, स्कूल बस फी ३.१२ लाख रुपये आकारले जातात. तसंच युनिफॉर्मसाठी २६ हजार रुपये खर्च येतो. आणि रजिस्ट्रेशन, री-एनरोलमेंट आणि एक्स्ट्राकरिक्युलर ॲक्टिव्हिटीज यासाठीही स्वतंत्र शुल्क आकारलं जातं. थोडक्यात, सर्व प्रकारचे खर्च एकत्र केले तर जवळपास १७ ते १८ लाख रुपये हा एका वर्षाचा खर्च आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, इतके पैसे देऊनसुद्धा मुलांना खाऊचा डबा घरूनच आणावा लागतो. फूड किंवा मील्सचा खर्च वेगळा करावा लागतो.


नेटकरी व्यक्त करताहेत आश्चर्य

हा व्हिडीओ १ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. कारण १८ लाख रुपयांत एखाद्या सरकारी शाळेतील विद्यार्थी पदवीधर होऊ शकतो. कोणी विचारतंय, इतकी जास्त फी घेऊन विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारचं शिक्षण दिलं जातंय. तर कोणाच्या मते, पाच वर्षांच्या फीच्या पैशांत भारतामधील कुठल्याही मेट्रो शहरात एखादा २ BHK फ्लॅट मिळेल. असो, या अवाढव्य खर्चावर तुमचं काय मत आहे? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.

(महत्वाची टीप - या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता सांगली दर्पण ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.