🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'जय जय मोदी, हर हर मोदी', दिल्लीत प्रेस क्लबमध्ये 'मोदी चालीसा' पठन, हातात धनुष्यबाण घेतलेल्या PM मोदींच्या पोस्टरची आरती

'जय जय मोदी, हर हर मोदी', दिल्लीत प्रेस क्लबमध्ये 'मोदी चालीसा' पठन, हातात धनुष्यबाण घेतलेल्या PM मोदींच्या पोस्टरची आरती


राजधानी दिल्लीतील प्रतिष्ठित 'प्रेस क्लब ऑफ इंडिया'च्या प्रांगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरतीचा आणि 'मोदी चालीसा' पठणाचा कार्यक्रम पार पडल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हातात धनुष्यबाण घेतलेल्या पंतप्रधान मोदींच्या पोस्टरसमोर काही लोकांनी आरती केली आणि 'जय जय मोदी, हर हर मोदी' अशा घोषणा दिल्या. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या, ज्यावर आता प्रेस क्लबने स्पष्टीकरण जारी केले आहे.

धनुष्यबाण हातात घेतलेले पोस्टर अन् 'श्री नरेंद्र मोदी चालीसा'
प्रेस क्लबच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात व्यासपीठावर 'भगवान श्री नरेंद्र मोदी चालीसा' असे लिहिलेला मोठा बॅनर लावला होता. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेची रीतसर आरती केली. पत्रकार परिषदेच्या नावाखाली हा धार्मिक आणि राजकीय स्वरूपाचा कार्यक्रम घेण्यात आल्याने समाजमाध्यमांवर यावरून मोठा गदारोळ झाला.
प्रेस क्लबचे स्पष्टीकरण काय?

वाद चिघळल्यानंतर प्रेस क्लब ऑफ इंडियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर अधिकृत पत्रक काढून भूमिका मांडली. 'प्रेस क्लबने या कार्यक्रमाचे आयोजन केलेले नव्हते. एका संस्थेने पत्रकार परिषदेसाठी सभागृह भाड्याने घेतले होते. मात्र, दिलेल्या नियमांचे आणि अटींचे उल्लंघन करून धार्मिक विधी सुरू केल्याचे निदर्शनास येताच प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करत हा कार्यक्रम बंद पाडला,' असे स्पष्टीकरण प्रेस क्लबने दिले आहे.

काँग्रेस-भाजपमधील जुना वाद पुन्हा चर्चेत
दिल्लीतील या वादानंतर राजकीय वर्तुळात सोशल मीडियावरील जुन्या वादांचीही चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी जून महिन्यात वाराणसीत युवक काँग्रेसच्या कार्यकर्ताओंनी राहुल गांधी यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पोस्टरवर 'दुग्धाभिषेक' केला होता. त्या पोस्टरमध्ये राहुल गांधी यांना 'भगवान परशुराम' यांच्या रूपात दाखवण्यात आले होते. त्यावेळी भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत हिंदू भावनांचा अनादर केल्याचा आरोप केला होता. भाजप नेते अमित मालवीय यांनी 'राहुल गांधी यांची तुलना भगवान परशुरामांशी करणे हा हिंदू श्रद्धेचा अपमान आहे,' अशी टीका केली होती. आता प्रेस क्लबमधील या 'मोदी चालीसा' प्रकरणामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.