देशात तरुणांमध्ये सध्याच्या व्यवस्थेविरोधात मोठा रोष निर्माण होत असून, देशातील हुकूमशाही वृत्तीचा कारभार आता संपण्याच्या मार्गावर आहे, असे वक्तव्य प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी केले आहे. केरळमधील त्रिशूर येथे डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या (DYFI) राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
‘तरुणांनी सरकारला जागा दाखवली’
आपल्या भाषणात प्रकाश राज यांनी केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट निशाणा साधला. ते म्हणाले, “देशातील तरुणांना आता खरी परिस्थिती समजली आहे. पेपरफुटीसारख्या मुद्द्यांवरून तरुणांनी सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे की, आम्ही तुम्हाला ओळखले आहे आणि आम्ही तुम्हाला घाबरत नाही. या आंदोलनांनी सरकारचा अहंकार मोडून काढला आहे.” यापूर्वी शेतकरी आणि कामगारांनीही आंदोलने केली, परंतु त्यांच्याकडे गमावण्यासारखे काही ना काही होते. मात्र आजच्या तरुण पिढीकडे गमावण्यासारखे काहीच उरलेले नाही, म्हणूनच हा लढा अधिक तीव्र आणि निर्भीड झाल्याचे ते म्हणाले.केवळ विद्यमान सरकारला किंवा सत्ताधारी पक्षाला सत्तेवरून खाली खेचणे हाच अंतिम उपाय नाही, असा इशारा देत प्रकाश राज म्हणाले, “एका हुकूमशाही शक्तीच्या जागी दुसरी हुकूमशाही प्रवृत्ती सत्तेवर येऊ नये, यासाठी नागरिकांनी आणि विशेषतः तरुणांनी राजकीयदृष्ट्या सजग राहणे गरजेचे आहे. राजकारणात विरोधी पक्ष स्वतःहून जिंकत नसतात, तर सत्ताधारी पक्षांच्या पराभवामुळे ते सत्तेवर येतात. त्यामुळे जनतेने पर्याय निवडताना जागरूक राहायला हवे.”
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.