🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सावधान! परवान्याशिवाय प्रसाद वाटल्यास १ लाखाचा दंड; एफडीएचा मोठा निर्णय

सावधान! परवान्याशिवाय प्रसाद वाटल्यास १ लाखाचा दंड; एफडीएचा मोठा निर्णय

अहिल्यानगर: गणेशोत्सवात देवस्थान, मंडळे आणि राजकीय नेते भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था करतात. यंदा त्यांना अन्न व औषधे प्रशासनाच्या परवान्याशिवाय हे दान करता येणार नाही. तसे केले नाही, तर दहा हजार ते एक लाख रुपये दंडाची कारवाई होऊ शकते.

भाविकांची सुरक्षा आणि आरोग्यासाठी विभागाने हे पाऊल उचलले आहे.

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला धार्मिक महत्त्व आहे. सोमवार आणि शनिवारी शंकराच्या तसेच मारुती, शनी मंदिरात गर्दी होत असते. विविध शिवालयांत दर सोमवारी भाविकांची मोठी गर्दी असते. तेथे राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते तसेच देवस्थानच्या वतीने भाविकांना प्रसाद वाटप केले जाते.

प्रसाद वाटप करण्यासाठी अन्न व औषधे प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. मात्र, त्याविषयी, ती घेण्याबाबत लोक अनभिज्ञ आहेत. या विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पूर्वीच्याच नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना नसल्यास दहा ते एक लाखापर्यंत दंड भरावा लागू शकतो.

फॉस्कोस म्हणजे काय?

सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांसाठी २०११ पासून फॉस्कोस (एफओएससीओएस) ऑनलाइन परवाना परिसंस्थेचा आत्मा आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर संबंधित जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या उपायुक्त कार्यालयाकडून पडताळणी होऊन परवाना दिला जातो.

आंबट-गोड एकत्र नको

आंबट विरोधी गोड असा आहाराचा समावेश असल्यास अतिसार, अन्नबाधा होते. विरोधी अन्न पदार्थ ठेवू नये. गोड बासुंदी आणि त्याच वेळेस आंबट कढी ठेवणे हा विरोधी आहार आहे. त्याबाबतचे नियम मित्रमंडळ व देवस्थानांनी पाळणे बंधनकारक आहे. त्याचे पालन होते की नाही, हे हा विभाग पाहणार आहे.

केटर्स असेल तर...

प्रसाद तयार करण्यासाठी अधिकृत केटर्सची नियुक्ती केल्यास प्रसाद वाटपासाठी परवाना घेण्याची आवश्यकता नाही. त्याकडील परवाना अधिकृत आणि नोंदणीकरण केलेला पाहिजे. प्रसादासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची बिले ठेवणे आवश्यक आहे.

प्रसादासाठी नियमावली

ज्या प्रसादाचे वाटप करायचे आहे. त्यांनी प्रसादाचे साहित्य अधिकृत परवाना असलेल्या दुकानातूनच खरेदी केले पाहिजे. कच्च्या मालाच्या सर्व पावत्या जपून ठेवणे आवश्यक आहे. शिळा किंवा उरलेल्या प्रसादाचे वाटप करू नये. दुग्धजन्य पदार्थांचे वाटप करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. त्यासाठी विशेष उपाययोजनांची आवश्यकता असते. प्रसाद तयार करताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे.

मोजक्याच देवस्थानांकडेच परवाना

जिल्ह्यातील मोजक्याच देवस्थानांकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचा प्रसादवाटपाचा परवाना आहे. त्यात शिर्डीतील श्री साईबाबा देवस्थान, शनिशिंगणापूरचे श्री शनैश्वर देवस्थान, पाथर्डीचे मोहटा देवस्थानचा समावेश आहे. उर्वरित देवस्थानांकडे हा परवाना नसल्याचे एफडीएकडून सांगण्यात आले.

शंभर रुपये शुल्क आकारून परवाना दिला जातो. देवस्थानच्या विश्वस्तांचे आधार कार्ड, देवस्थानचा ठराव आदी बाबींची पूर्तता करावी. व्यक्ती किंवा मंडळाला प्रसाद वाटपासाठी त्याचे आधार कार्ड, मंडळाची धर्मादायकडे नोंदणी हवी. विनापरवाना प्रसाद वाटल्यास दंडासह सहा महिन्यांच्या शिक्षेची तरतूद आहे. प्रसादाने गंभीर इजा झाल्यास तीन वर्षांपर्यंत शिक्षा, तर मृत्यू झाल्यास सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.

- किरण जगदाळे, अन्न सुरक्षा अधिकारी, एफडीए, अहिल्यानगर.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.