कायद्याचा बडगा की पैशांचा पडदा? बँक मॅनेजरच्या घरावर डल्ला मारणाऱ्या अंकलीच्या माजी सरपंचाला पोलिसांची 'खास' सहानुभूती!
सांगली :- बँक मॅनेजरच्या घरावर दरोडा टाकून लाखांचा ऐवज लांबवणाऱ्या अंकलीच्या माजी सरपंचावर पोलीस प्रशासन मेहेरबान झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाखोंचा मुद्देमाल जप्त होऊनही संशयित माजी सरपंचाला पोलिसांनी साधी 'नोटीस' देऊन सोडून दिल्याने सांगलीसह संपूर्ण राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
कायद्याचा न्याय की खाकीची गनिमी कावा?
चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत झाला असून संशयित आजारी आहे, असे तकलादू स्पष्टीकरण देत पोलिसांनी सरपंचाला घरचा रस्ता दाखवला. मात्र या कारवाईमुळे सर्वसामान्य जनतेतून काही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत:आमदारांना आणि सरपंचांना वेगळा कायदा? सर्वसामान्य किंवा गरिबातील गरिबाने किरकोळ चोरी केली तरी पोलीस बेदम चोप देऊन कोठडीत डांबतात; मग या माजी सरपंचाला 'नोटीस' देऊन सोडण्याचे औदार्य का दाखवले?आजाराचे ढोंग की पोलिसांचे पांघरूण? एवढी मोठी घरफोडी करताना सरपंचाची प्रकृती उत्तम होती, मग अटकेची वेळ येताच अचानक प्रकृती कशी बिघडली?
प्रसिद्ध वडापाववाल्याची एंट्री अन् आर्थिक 'डील'चा वास!
या संपूर्ण हाय-व्होल्टेज ड्रामामध्ये एका 'प्रसिद्ध वडापाववाल्या'ची एंट्री झाल्याची जोरदार चर्चा आहे. हा वडापाववाला पोलीस आणि संशयित आरोपी यांच्यात मध्यस्थाची भूमिका बजावत असल्याची माहिती समोर येत आहे. लाखांची उलाढाल? सरपंचाला अटकेपासून वाचवण्यासाठी आणि 'नोटीस'चा सोपस्कार पूर्ण करण्यासाठी खाकीच्या आडोशाने मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
तपासावर प्रश्नचिन्ह: खाकी, राजकारण आणि वडापाववाल्याची ही 'त्रिपुटी' कायदा आणि सुव्यवस्थेचा पुरता बट्ट्याबोळ करत असल्याचे चित्र आहे.
पोलीस प्रशासनाला थेट सवाल:
एकीकडे गुन्हेगारी मोडून काढण्याच्या बाता मारणारे पोलीस प्रशासन एका दरोडेखोर सरपंचासमोर एवढे हतबल का झाले? चोरीचा माल मिळाला म्हणजे गुन्हा माफ होतो का? की या प्रकरणात वरून काही राजकीय दबाव आणि आर्थिक रस दडलाय? या 'खास' मेहेरबानीची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.