🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्नाळ ओढ्यालगत चालणाऱ्या गावठी दारूच्या भट्टीवर एलसीबीचा छापा; दोन आरोपी फरार, १७,७०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट

कर्नाळ ओढ्यालगत चालणाऱ्या गावठी दारूच्या भट्टीवर एलसीबीचा छापा; दोन आरोपी फरार, १७,७०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट
सांगली :-जिल्ह्यात अवैध आणि आरोग्यास घातक असणाऱ्या गावठी हातभट्टी दारू उत्पादकांविरुद्ध सांगली पोलिसांनी विशेष मोहीम तीव्र केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने माधवनगर ते कर्नाळ रस्त्यावरील ओढ्यालगत सुरू असलेल्या एका गावठी दारूच्या भट्टीवर अचानक छापा टाकून सुमारे ४०० लिटर कच्चे रसायन आणि साहित्य जागीच नष्ट केले. या कारवाईत एकूण १७,७०० रुपयांचा मुद्देमाल उद्ध्वस्त करण्यात आला असून दोन सराईत आरोपी फरार झाले आहेत.

​गोपनीय बातमीदाराच्या माहितीवरून कारवाई

​सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांनी जिल्ह्यातील अवैध हातभट्ट्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले होते.

​दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी हे पथक सांगली उप-विभागातील माधवनगर परिसरात गस्तीवर असताना, अंमलदार अनिल कोळेकर व विक्रम खोत यांना कर्नाळ हद्दीतील 'एस.सी. सीड्स अँड फूड्स फॅक्टरी'च्या उत्तरेस ओढ्यालगत लोखंडी बॅरल व कोळशाच्या साहाय्याने हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली.

​पोलीस येताच आरोपी पसार; जमिनीतील बॅरल्स उकरून केले नष्ट

​माहिती मिळताच पथकाने सिमेंट फॅक्टरीजवळ गाड्या थांबवून ओढ्याच्या दिशेने पायी कूच केली. पोलिसांची चाहूल लागताच भट्टी चालवणारे दोन इसम तिथून पळून गेले.
​पोलीस पथकाने परिसरात शोध घेतला असता, तिथे उग्र वास येत असल्याचे जाणवले. बारीक पाहणी केली असता जमिनीमध्ये पुरलेले २०० लिटर क्षमतेचे २ लोखंडी बॅरल्स आढळून आले. त्यामध्ये ४०० लिटर गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन (किंमत रु. १६,०००/-), रिकामे लोखंडी बॅरल्स आणि लोखंडी डबे (एकूण किंमत रु. १७,७००/-) असा मुद्देमाल मिळून आला.

​हे दारूचे रसायन मानवी आरोग्यास अत्यंत अपायकारक व हानिकारक असल्याने पोलिसांनी कायदेशीर सॅम्पल काढून घेतल्यानंतर, उर्वरित सर्व रसायन, लोखंडी बॅरल्स व डबे पार आणि सळईच्या साहाय्याने जमिनीतून उकरून जागीच चक्काचूर करून नष्ट केले.

​फरार आरोपींवर गुन्हा दाखल

​तपासादरम्यान ही अवैध हातभट्टी १) महाराज कुंभार मारवाडी व २) काल्या कुंभार मारवाडी (दोघे रा. कंझारभाट वस्ती, कर्नाळ, ता. मिरज, जि. सांगली) यांची असल्याचे निष्पन्न झाले आहे.

​याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विक्रम ईश्वर खोत (बॅज नं. २३६०) यांच्या फिर्यादीवरून सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात अपराध क्र. २३८/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (बी), ६५ (सी), ६५ (डी), ६५ (ई) व ६५ (एफ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

​ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस अंमलदार अतुल माने, नागेश खरात, सागर लवटे, अनिल कोळेकर, सतीश माने, दर्याप्पा बंडगर आणि विक्रम खोत यांच्या पथकाने केली.
​"जिल्ह्यात गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या व विक्री करणाऱ्या इसमांवर अशीच विशेष मोहीम राबवून अत्यंत कठोर कारवाई केली जाईल."
— संजीव झाडे (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.