नीट पेपरफुटी प्रकरणात मोदी सरकारमधील शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी 'स्कूल ठीक करो' अभियानाची सुरुवात केली आहे. अनावश्यक गोष्टींवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्याऐवजी सरकारी शाळांच्या पायाभूत सुविधांकडे सरकारने लक्ष द्यावे, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
आज स्वातंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर दिपके यांनी हिंगोली जिल्ह्यातील त्यांच्या मूळ संतुक पिंपरी गावातून या अभियानाला सुरुवात केली. आजच्या पहिल्याच शाळा भेटीत त्यांना पिण्याच्या पाण्याची अनुपलब्धता, बाकांची कमतरता, अस्वच्छ प्रसाधनगृहे, वर्ग खोल्यांच्या तुटलेल्या खिडक्या आणि अपुरा पाणीपुरवठा अशा गोष्टी आढळून आल्या.
एका बाजूला या अभियानातून सरकारवर आणि सरकारच्या धोरणांवर टीका होत असताना दिपके यांच्या मोहिमेचे भाजपचे नेते आणि शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी स्वागत केले आहे. अभियानाचे स्वागत करताना भोयर यांनी सरकारच्या कामांचे नागरिक आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ऑडिट झाले पाहिजे, अशीही भूमिका मांडली.भोयर म्हणाले, सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे सामाजिक संस्थांनी आणि नागरिकांनी परीक्षण करावे. कोणत्या कामांमधून चांगले परिणाम मिळाले आणि कुठे सुधारणा आवश्यक आहे, याबाबत सर्वसामान्यांनी सूचना कराव्यात. पण केवळ टीका करण्याऐवजी सरकार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामांचीही दखल घेतली पाहिजे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केले.
'चांगल्या शाळांनाही भेट द्या'
महाराष्ट्रातील ज्या शाळा चांगले काम करत आहेत, त्यांच्या उपक्रमांचीही माहिती 'स्कूल ठीक करो' अभियानाच्या माध्यमातून घेतली जावी, अशी अपेक्षा पंकज भोयर यांनी व्यक्त केली. केवळ सरकारी शाळांमधील समस्या समोर आणण्यापेक्षा चांगले प्रयोग करणाऱ्या शाळांचे मॉडेल इतर शाळांपर्यंत पोहोचवणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
फडणवीसांच्या तिरंगा रॅलीवरून दिपकेंचा सवाल :
दिपके यांनी अभियानाची घोषणा करताना सरकारी शाळांच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. आतापर्यंतच्या सर्वच सत्ताधारी पक्षांनी सरकारी शाळांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. ग्रामीण भागातील शाळांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी सरकारकडून इतर गोष्टींवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असल्याची भूमिका त्यांनी मांडली.'स्कूल ठीक करो' अभियान सुरू करण्यापूर्वी दिपके यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तिरंगा रॅलीच्या आयोजनावर आणि बॅनर्सवर होणाऱ्या खर्चावर प्रश्न उपस्थित केला होता. रॅलीच्या बॅनरबाजीवर होणारा खर्च ग्रामीण भागातील सरकारी शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी वापरला असता, तर त्याचा अधिक उपयोग झाला असता, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.