जळगाव : आपल्या कडक शिस्त, धडाकेबाज कार्यशैली आणि भेसळमाफियांचे धाबे दणाणणाऱ्या कारवायांमुळे सतत चर्चेत असणारे डॅशिंग आयएएस अधिकारी तथा अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी आता सर्वसामान्य जनता भक्कमपणे उभी राहिली आहे.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा ग्रामपंचायतीने 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी आयोजित ग्रामसभेत एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता गावातील प्रत्येक घरात तुकाराम मुंढे यांचा फोटो लावला जाणार आहे.
एफडीएच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी मुंबई, पुण्यासह राज्यभरातील निकृष्ट दर्जाचे अन्न विकणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. कित्येक बेकायदेशीर आस्थापनांचे परवाने थेट रद्द किंवा निलंबित करण्यात आले आहेत. मात्र, या धडक कारवायांमुळे त्रस्त झालेले भेसळमाफिया आणि प्रशासनातील काही अधिकारी पडद्यामागून तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी जोरदार प्रयत्न करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. 21 वर्षांच्या प्रशासकीय सेवेत तब्बल 25 वेळा बदल्या झेललेल्या मुंढेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी कुऱ्हा ग्रामपंचायतीने स्वातंत्र्यदिनी मुंढेंचे फोटो घराघरात लावण्याचा निर्णय घेतला आहे.
घराघरात झळकणार तुकाराम मुंढेंचे फोटो
गावातील सरपंचांसह ग्रामस्थांनी सर्व नागरिकांना आपल्या घरात तुकाराम मुंढेंचा फोटो लावण्याचे जाहीर आवाहन केले आहे. शासकीय अधिकाऱ्याच्या समर्थनार्थ असा धाडसी आणि आगळावेगळा निर्णय घेणारी कुऱ्हा ही राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे. सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्याचा हा एक प्रकारे नागरी सत्कारच मानला जात आहे.
कुऱ्हा ग्रामपंचायतीचा निर्णय राज्यभरात कौतुकाचा
तुकाराम मुंढेंच्या धडक कारवायांमुळे एकीकडे भेसळखोरांचे धाबे दणाणले असताना, दुसरीकडे सर्वसामान्य नागरिक स्वतःहून पुढे येत भेसळ रोखण्यासाठी सहकार्य करत आहेत. राजकीय दबाव आणि बदल्यांच्या सत्रामध्ये जनतेने दिलेला हा पाठिंबा राज्यभरात कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे. तुकाराम मुंढेंच्या कारवाईने भेसळखोरांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. मात्र दूध, पनीरमधील भेसळीविरोधात तुकाराम मुंढेंनी केलेल्या कारवाईचे राज्यभरातून स्वागत होत आहे. सोशल मीडियावर देखील कौतुक होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.