🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली दर्पण Exclisive! सांगलीत भेसळबाजांना 'अभय' कुणाचे? राज्यभरात FDA चा धाक, मग जिल्ह्यातच 'अर्थपूर्ण' शांतता का?​

सांगली दर्पण Exclisive! सांगलीत भेसळबाजांना 'अभय' कुणाचे? राज्यभरात FDA चा धाक, मग जिल्ह्यातच 'अर्थपूर्ण' शांतता का?

सांगली :-​राज्यभरात सध्या अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवायांचे सत्र सुरू केले आहे. तुकाराम मुंढे यांच्यासारख्या धडाडीच्या अधिकाऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे गल्लीबोळातील टपऱ्यांपासून ते 'मॅकडोनाल्ड', 'डॉमिनोस', 'ब्लिंकइट' यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या, नामांकित हॉटेल्स, आयुर्वेदिक ब्रँड्स आणि दारू उत्पादकांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, महाराष्ट्रात सगळीकडे भेसळीविरुद्ध 'सर्जिकल स्ट्राईक' सुरू असताना सांगली जिल्ह्यात मात्र सामसूम का? हा प्रश्न आता सामान्य सांगलीकरांच्या पोटात गोळा आणत आहे.
सांगलीत खरोखरच दूध, मिठाई आणि अन्नपदार्थ शुद्ध मिळतात की कारवाया रोखण्यासाठी पडद्यामागे 'अर्थपूर्ण व्यवहार' शिजत आहेत? असा सवाल आता उघडपणे विचारला जाऊ लागला आहे.

​गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ब्रँडवर कारवाई, मग सांगली 'क्लीन चिट' मोडमध्ये कशी?

​हॉटेल व्यवसाय, दुधाची संकलन केंद्रे, मिठाईची दुकाने, औषध विक्रेते, आणि रस्त्यावरील टपऱ्या... या सर्वच ठिकाणी काही प्रमाणात होणारी भेसळ हा आजवरचा सर्वसामान्य अनुभव आहे. अशा वेळी जेव्हा आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात बड्या-बड्या आस्थापनांचे परवाने रद्द केले जात आहेत, सील ठोकले जात आहेत, तिथे सांगलीत मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आणि तीही 'नावापुरती' कारवाई का होत आहे?

​सांगलीकरांचा थेट सवाल:

"राज्यभरात बडे ब्रँड्स भेसळयुक्त आणि अस्वच्छ अन्न विकताना रंगेहात पकडले जात आहेत. मग सांगलीतील हॉटेल, दूध संकलन केंद्रे आणि नामांकित दुकाने अचानक 'दूधाने धुतलेली' कशी झाली? स्थानिक एफडीए अधिकाऱ्यांचा हा आळस आहे की भेसळमाफियांसोबत झालेली 'सेटिंग'?"

​'त्या' तुटपुंज्या कारवायांचा दिखावा कुणासाठी?

​जिल्ह्यात खाद्यपदार्थांचे हजारो नमुने दररोज विकले जातात. सणासुदीच्या काळात दूध, खवा, आणि मिठाईमधील भेसळ गगनाला भिडते. असे असूनही सांगली एफडीए कडून फक्त 'सोपस्कार' पूर्ण करण्यासाठी एखाद्या छोट्या दुकानावर कारवाईचा दिखावा केला जातो. बड्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि मोठ्या दूध संकलन केंद्रांकडे मात्र अधिकारी फिरकतही नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

​तुकाराम मुंढेंचा पॅटर्न सांगलीत कधी लागू होणार?

​राज्यात जिथे जिथे तुकाराम मुंढे यांची नजर जाते, तिथे भेसळबाजांचे धाबे दणाणतात. मग सांगली जिल्ह्यासाठी असा कडक नियम आणि धडक मोहीम का राबवली जात नाही? सांगलीतील सामान्य जनतेच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ आता थांबणार कधी?

​स्थानिक अधिकाऱ्यांची 'अर्थपूर्ण' गुप्तता: एफडीएच्या स्थानिक पथकाचे छापे नेमके कुठे पडतात आणि त्याचे अहवाल कुठे जातात, हे कोणालाच कळत नाही.

​जनतेच्या जिवाशी खेळ: भेसळयुक्त अन्न आणि औषधांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

​जर प्रशासनाने त्वरित सांगलीतही व्यापक आणि कठोर मोहीम उघडली नाही, तर सांगलीकर जनता रस्त्यावर उतरून एफडीएच्या कारभाराचा पंचनामा करेल, असा इशारा आता नागरिक आणि विविध संघटनांकडून दिला जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.