सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मिळणार 'या' सवलती
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि नागरिकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुष्काळ जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग सोपा झाला आहे.
केंद्र सरकारच्या दुष्काळ निकषांनुसार ट्रिगर 1 लागू झालेल्या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे, याचा अर्थ 75 टक्के महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांना दिलासा देण्यासाठी विविध सवलती लागू करण्यात येणार आहेत. यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीला स्थगिती यांचा समावेश आहे. तसेच कृषीपंपांच्या वीजबिलाबाबतही दिलासा देण्यात आला आहे. 7.5 हॉर्सपॉवर क्षमतेपर्यंतच्या कृषीपंपांचे वीजबिल आधीच माफ करण्यात आले असून, त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या पंपांनाही सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
पाणी आणि चाऱ्यासाठी विशेष नियोजन
दुष्काळी परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषीपंपांची वीजजोडणी खंडित केली जाणार नाही.
शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांना अन्नधान्याचा पुरवठा करण्याबरोबरच जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात येणार असून, पिण्याचे पाणी आणि पशुधनासाठी पाण्याचे नियोजनही सुरूच ठेवण्यात येणार आहे.
5 ऑक्टोबरपासून पिकांचे पंचनामे
दरम्यान, दुष्काळग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे 5 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पिकांची प्रत्यक्ष स्थिती आणि नुकसानीची नोंद अचूकपणे व्हावी यासाठी पिकांची छायाचित्रे आणि जीपीएसच्या माध्यमातून माहिती संकलित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळी भागाची पाहणी केली होती. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधल्यानंतर त्यांनी दुष्काळ जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आल्याने शेतकऱ्यांना शासनाच्या विविध सवलती आणि मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.