🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सार्वजनिक गणेशोत्सवाला १२७ वर्षे पूर्ण; मराठी भाषिक मुस्लिम मंचाचा मळणगावात ऐतिहासिक उपक्रम: १२७ वृक्षांना देणार स्वातंत्र्यसैनिकांची नावे!

सार्वजनिक गणेशोत्सवाला १२७ वर्षे पूर्ण; मराठी भाषिक मुस्लिम मंचाचा मळणगावात ऐतिहासिक उपक्रम: १२७ वृक्षांना देणार स्वातंत्र्यसैनिकांची नावे!


स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांच्या उपस्थितीत जपणार क्रांतीस्मृती; पर्यावरण संवर्धन व सामाजिक सलोख्याचा राज्यभरात संदेश

​
मळणगाव :- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ करून १२७ वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्यावर मराठी भाषिक मुस्लिम मंचाच्या वतीने मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे १२७ वृक्षारोपणाचा अत्यंत अभिनव व ऐतिहासिक उपक्रम पार पडला. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक स्वरूपापुरता मर्यादित न ठेवता त्यातून राष्ट्रीय एकात्मता, समाजहित आणि निसर्गसंवर्धनाचा ठोस संदेश जावा, या उदात्त उद्देशाने हा संकल्प करण्यात आला आहे.

​वृक्षांना स्वातंत्र्यसैनिकांची नावे व संगोपनाची जबाबदारी

या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे रोपण करण्यात येणाऱ्या सर्व १२७ वृक्षांना देशाच्या महान स्वातंत्र्यसैनिकांची नावे दिली जाणार आहेत. आगामी काळात या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांना व वारसांना (उत्तराधिकाऱ्यांना) सन्मानाने आमंत्रित करून त्यांच्याच हस्ते व उपस्थितीत या चळवळीची पुढील वाटचाल निश्चित केली जाणार आहे. 

​वृक्षारोपणासोबतच त्यांचे दीर्घकालीन जतन व संगोपन होणे गरजेचे असल्याने, मळणगाव येथील 'थोर स्वातंत्र्यसैनिक बाळकृष्ण ज्ञानोबा बुकटे चॅरिटेबल ट्रस्ट'शी संपर्क साधण्यात आला होता. या विधायक कार्याचे महत्त्व ओळखून ट्रस्टने तातडीने सकारात्मक प्रतिसाद देत वृक्षसंवर्धनासाठी आपली जागा उपलब्ध करून दिली.

​उत्साहात पार पडला शुभारंभ

दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता बुकटे मळा येथील स्मारक परिसरातील शेतजमिनीवर या सामूहिक वृक्षारोपणाचा शुभारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळकृष्ण ज्ञानोबा बुकटे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार बुकटे हे होते, तर प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत डॉ. लक्ष्मण शिंदे यांनी केले. 

​'एक वृक्ष–एक जबाबदारी'चा संकल्प
प्रास्ताविकादरम्यान बोलताना डॉ. लक्ष्मण शिंदे म्हणाले की, गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक सलोखा, सर्वधर्मसमभाव आणि पर्यावरण रक्षणाचा हा त्रिवेणी संगम अत्यंत प्रेरणादायी आहे. मराठी भाषिक मुस्लिम मंचाचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगत त्यांनी मंचाचे संस्थापक शाहीन शेख, ट्रस्टचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांचे मनापासून अभिनंदन केले.

​केवळ झाडे लावून फोटो काढण्यापुरते मर्यादित न राहता ‘एक वृक्ष–एक जबाबदारी’ या भावनेतून प्रत्येक रोपट्याचे काटेकोर संगोपन केले जाईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. मळणगावाच्या भूमीतून सुरू झालेली ही सामाजिक सलोख्याची आणि निसर्गसंवर्धनाची चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याचा दृढ मानस मंचाचे संस्थापक शाहीन शेख यांनी व्यक्त केला.
​मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

या प्रसंगी बाळकृष्ण ज्ञानोबा बुकटे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार बुकटे, सचिव राजाराम बुकटे, दादासो पाटील, डॉ. अजय भोसेकर, अनुपमा बोंगाळे, राबिया चिंचणीकर, प्रा. एम. ए. देसाई, सारिका कुलकर्णी, कल्पना कोरडे, तौफिक मुल्ला, संपत चव्हाण, प्रकाश डकनदार, प्रमोद माळी, चंद्रकांत पाटील, केतन कांबळे, रमेश मलमे, कल्लाप्पा गौडाडी, ॲड. संदीप पवार, डॉ. लक्ष्मण शिंदे, रफिक पटेल, मंचाचे संस्थापक शाहीन शेख, ट्रस्टचे इतर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मळणगाव परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.