मिरज :- मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (सिव्हिल हॉस्पिटल) भव्य कमान कोसळून ९ जण गंभीर जखमी झाल्याच्या अत्यंत दुर्दैवी अन् थरारक घटनेला तब्बल ६ दिवस उलटले आहेत. मात्र, एवढी मोठी भीषण दुर्घटना घडूनही अद्याप प्रशासनाकडून एकावरही एफआयआर (FIR) दाखल झालेला नाही. या गंभीर प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि सिव्हिल प्रशासन दोन्ही हात झटकून 'अळीमिळी गुपचिळी' धरून बसले असल्याने "यात नेमके काय गौडबंगाल दडले आहे?" असा संतापजनक प्रश्न आता सांगली-मिरज जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता विचारत आहे.
ठेकेदार कोण हे माहीत असूनही मेहेरबानी कोणावर?
सिव्हिलच्या या कमानीचे काम कोणत्या ठेकेदाराला दिले होते, याचे पूर्ण सोपस्कार आणि दस्तावेज PWD कडे स्पष्ट असतानाही पोलिसांत तक्रार देण्यासाठी इतका विलंब का केला जातोय? हा केवळ निष्काळजीपणा नसून संबंधित निष्काळजी ठेकेदाराला अन् जबाबदार अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर मोठे ‘अर्थपूर्ण’ व्यवहार झाल्याचा उग्र वास आता येऊ लागला आहे. ९ निष्पापांचा जीव टांगणीला लागलेला असताना प्रशासन मात्र चौकशीच्या कागदी घोड्यांचा खेळ खेळण्यात मग्न आहे.
नेमके काय घडले होते?
सहा दिवसांपूर्वी मिरज सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावरील कमान अचानक पत्त्यांसारखी कोसळली. या दुर्घटनेत रुग्णांचे नातेवाईक व नागरिक असे ९ जण गंभीर जखमी झाले. काहींना कायमचे अपंगत्व येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या निष्पाप नागरिकांवर असा काळ घाला घालेल असे कोणालाही वाटले नव्हते.
प्रशासनाचा संशयास्पद कारभार अन् जनतेचा थेट सवाल:
दोषींवर कारवाईस विलंब का? घटना घडल्या घडल्या तात्काळ गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना ६ दिवस उलटूनही पोलिस ठाण्याची पायरी चढायला PWD किंवा सिव्हिलचा एकही अधिकारी पुढे आलेला नाही.बळी जाण्याची वाट पाहत आहात का? ९ लोक गंभीर जखमी झाले आहेत; कोणाचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? ठेकेदाराला पाठीशी घालणारा तो 'अदृश्य हात' कोणाचा? निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर मेहेरनजर दाखवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा थेट आरोप नागरिक करत आहेत.
जनतेचा रोष चरमसीमेवर, एफआयआर कधी होणार?
प्रशासनाच्या या 'गांधारी' भूमिकेमुळे मिरज आणि सांगली परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. केवळ चौकशी समित्यांचे नाटक न करता संबंधित निष्काळजी ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा अधिकृत गुन्हा नोंदवून त्यांना बेड्या ठोकल्या पाहिजेत, अशी एकमुखी मागणी आता जोर धरू लागली आहे. आता पोलिस आणि जिल्हा प्रशासन या 'गौडभंगाला'चा बुरखा फाडून अधिकृत गुन्हा कधी दाखल करणार, याकडे संपूर्ण जनतेचे लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.