सांगलीवाडीतील ATM चोरीचा छडा: सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून आंतरराज्यीय सराईत टोळीतील २ आरोपींना अटक; ११ गुन्हे उघड, १०.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त
सांगली :- सांगलीवाडी येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन वाहनाला बांधून थेट उपटून नेणाऱ्या आंतरराज्यीय सराईत टोळीचा सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत राजस्थान येथील दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १० लाख ६८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातील तब्बल ११ गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.
नेमकी घटना काय?
दिनांक १५ ते १६ सप्टेंबर २०२६ च्या दरम्यान सांगलीवाडी परिसरातील एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी पैशांसह चोरून नेले होते. याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा (गु.र.नं. ३८५/२०२६) दाखल करण्यात आला होता. महाराष्ट्रासह इतर राज्यांतही याच पद्धतीने एटीएम मशीन चोरीच्या घटना घडत असल्याने या गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) तपासाचे विशेष आदेश दिले होते.
तपासाचे चक्र आणि गोपनीय बातमीदाराची मदत
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. तपासात चोरट्यांनी चारचाकी (बोलेरो) आणि दुचाकी वाहनांचा वापर केल्याचे निष्पन्न झाले. दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस अंमलदार अनिल कोळेकर, नागेश खरात, सागर लवटे व अमर नरळे यांना गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की, राजस्थान पासिंगच्या चॉकलेटी रंगाच्या 'महिंद्रा बोलेरो कॅम्पर गोल्ड' गाडीतून रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सांगली परिसरात फिरत आहेत. एलसीबीच्या पथकाने तत्काळ सापळा रचून या वाहनाला आणि त्यातील दोन जणांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१. बहादूर प्रल्हादराम चौकीदार बावरी (वय ३६ वर्षे, रा. कुलीयाना, ता. परबतसर, जि. डिडवाना-कुचामन, राजस्थान)२. गोपाल तेजाराम बावरी (वय ३४ वर्षे, रा. रावलियावास, ता. डेंगाना, जि. नागौर, राजस्थान)यांचा तिसरा साथीदार अर्जुन प्रेमाराम मेघवाल (रा. राजस्थान) हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.)
गॅस कटर अन् तुटलेले एटीएम हस्तगत
संशयितांची अंगझडती आणि वाहनाची झडती घेतली असता, ५०० रुपये दराच्या ३० नोटा (१५,००० रुपये), गॅस कटर, गॅस सिलेंडर, नॉयलॉनचे दोरखंड आणि लोखंडी टॉमी मिळून आले. कडक चौकशीदरम्यान आरोपींनी सांगलीवाडी येथील एटीएम मशीन बोलेरो गाडीला दोराने बांधून ओढून तोडल्याची अन् चोरल्याची कबुली दिली. चोरलेले एटीएम मशीन त्यांनी लक्ष्मीफाटा ते कसबेडिग्रज रोडवरील उसाच्या शेतात नेऊन गॅस कटरने कापले होते. पोलिसांनी पंचांसमक्ष त्या शेतातून एटीएम मशीनचे तुकडे हस्तगत केले आहेत.
एकूण १०,६८,३०० रुपयांचा जप्त मुद्देमाल:
महिंद्रा बोलेरो कॅम्पर गोल्ड गाडी (किंमत रु. ८,००,०००/-)२ हिरो स्प्लेंडर मोटारसायकली (किंमत रु. २,००,०००/-)३० भारतीय चलनी नोटा (किंमत रु. १५,०००/-)गॅस सिलेंडर, नोझल, पाईप व अँटी-फायर सिलेंडर (किंमत रु. २२,०००/-)लोखंडी हातोडा, रॉड, नायलॉन रोप व पट्टा (किंमत रु. १,३००/-)ओपो व व्हिव्हो कंपनीचे २ मोबाईल (किंमत रु. २०,०००/-)एटीएम मशीनचे लोखंडी तुकडे (किंमत रु. १०,०००/-)गुन्हे करण्याची भयानक पद्धतही टोळी अत्यंत सराईतपणे काम करायची:१. रेकी आणि भाड्याची खोली: ज्या भागात चोरी करायची आहे, त्यापासून ५० ते ६० किमी अंतरावरील ग्रामीण भागात ही टोळी भाड्याने खोली घेऊन राहायची.२. गाड्यांची चोरी: रेकी करण्यासाठी व गुन्ह्यासाठी ते आजूबाजूच्या परिसरातून दुचाकी गाड्या चोरी करायचे.३. एटीएमची निवड: कमी लोकवस्तीच्या ठिकाणचे आणि जमिनीपासून ३ ते ४ फूट उंचीवर असलेले एटीएम टार्गेट केले जायचे.४. रात्रीची चोरी: रात्रीच्या वेळी बोलेरो गाडीला भक्कम दोरखंड बांधून एटीएम मशीन ओढून उखडले जायचे. त्यानंतर उसाच्या शेतात किंवा निर्जन स्थळी गॅस कटरने मशीन कापून रोख रक्कम काढली जायची.
उघडकीस आलेले ११ गुन्हे:
या टोळीवर महाराष्ट्र, राजस्थान आणि दिल्लीमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. बहादूर चौकीदार याच्यावर ३० पेक्षा जास्त, तर गोपाल बावरी याच्यावर ४० पेक्षा जास्त एटीएम चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमुळे खालील ११ गुन्हे उघडकीस आले आहेत:
महाराष्ट्र: सांगली शहर, सटाणा (नाशिक), एमआयडीसी (सोलापूर), भाग्यनगर (नांदेड), फलटण (सातारा).
तेलंगणा: येल्लारेड्डीपेट व मेहबुबनगर पोलीस ठाणे.
आंध्र प्रदेश: गुंडकुल १ टाऊन, बुकाराया समुद्रम, मदनपल्ली २ टाऊन.
कर्नाटक: शिगाव (जि. हवेरी).
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, सपोफी सुभाष सूर्यवंशी, अंमलदार अनिल कोळेकर, सागर लवटे, नागेश खरात, अमर नरळे, सागर टिंगरे, दर्याबा बंडगर, संदीप नलावडे, सतीश माने, महादेव नागणे, अमीरशा फकीर, संदीप गुरव, उदय माळी, सोमनाथ पतंगे, विनायक सुतार, विक्रम खोत, मोतीराम खोत, सुशांत चिले, गणेश शिंदे, महेश कुंभार, करण परदेशी, विजय पाटणकर, कॅप्टन गुंडवाडे, अजय पाटील आणि सांगली सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही मोठी कामगिरी बजावली.
पुढील तपासासाठी आरोपींना व जप्त साहित्याला सांगली शहर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.