ईश्वरपूर : राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असताना सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि शिराळा तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाची होळी करण्यात आली. यावेळी वाळवा शिराळा दुष्काळ तालुका जाहीर करावा या मागणीचे निवेदन तहसीलदार सारिका रासकर यांना देण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांनी आक्रमक भूमिका घेत, वाळवा आणि शिराळा तालुके तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला. जाधव म्हणाले, दोन्ही तालुक्यांत पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन, भात, भुईमूग, ऊस आणि द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके हातची गेली असताना शासनाने केवळ कागदोपत्री आकडेवारीच्या आधारे दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेऊ नये. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन परिस्थितीची पाहणी करावी. कागदी घोडे नाचविणे बंद करावे.
“वाळवा आणि शिराळा तालुके दुष्काळाच्या संकटात असताना त्यांना दुष्काळग्रस्त यादीतून वगळणे हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. पूर्णपणे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची होळी करून आम्ही शासनाचा निषेध केला आहे. मुख्यमंत्री यांनी तातडीने दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत व आवश्यक सवलती द्याव्यात,” अशी मागणी जाधव यांनी केली. दरम्यान, कोयना आणि वारणा धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असताना नदीवरील उपसा बंदीचा निर्णय रद्द करावा आणि कृष्णा नदीचे पाणी शेतीसाठी तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी करण्यात आली. संतप्त शेतकऱ्यांनी शेतातून आणलेल्या सडलेल्या सोयाबीनची तहसीलदार कार्यालयासमोर होळी करून शासनाच्या धोरणाचा निषेध केला.याबाबत तहसीलदार सारिका रास्कर यांना वाळवा-शिराळा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव, प्रवक्ते अॅड. एस. यू. संन्दे, द्राक्षबाग राज्य संघटनेचे संचालक शेखर शेळके, प्रहारचे दिग्विजय पाटील, प्रदीप नागरे, आकाश साळुंखे, प्रभाकर पाटील, शहराध्यक्ष अनिल करळे, प्रकाश माळी, शहाजी पाटील, धनाजी महाजन, पांडुरंग माळी, योगेश पद्मन, अधिक इदाते, अंकुश अहिर, संजय माळी, तुकाराम घुगे, अतुल भिलवडे, ओंकार पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.