सांगली दर्पण Exclusive! संजयनगर बनले ऑनलाईन कॅसिनो व मटका जुगाराचा अड्डा! तरुण पिढीच्या उद्ध्वस्तावर पोलिसांचे संशयास्पद मौन; आक्रमक नागरिकांचा थेट आंदोलनाचा इशारा
सांगली :- सांगली शहरातील एकेकाळचा शांतताप्रिय मानला जाणारा संजयनगर परिसर सध्या ऑनलाईन कॅसिनो, मटका आणि इतर अवैध धंद्यांचे भयंकर जाळे बनला आहे. गल्लीबोळांत, बंद खोल्यांमध्ये आणि मोबाईलच्या स्क्रीनवर फोफावलेल्या या ऑनलाईन कॅसिनो आणि मटक्याच्या नादात स्थानिक तरुण पिढी पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, गुन्हेगारीने अत्यंत भयानक रूप धारण केले आहे. मात्र, डोळ्यांसमोर सुरू असलेल्या या काळ्या धंद्यांवर संजयनगर पोलिसांचे संशयास्पद मौन पाहता "पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प का?" असा संतप्त सवाल हैराण नागरिक विचारत आहेत.
करोडोंची उलाढाल आणि गुन्हेगारीचा नंगानाच
संजयनगर परिसरात मोबाईल, लॅपटॉप आणि गुप्त कॉम्प्युटर सेंटर्सच्या माध्यमातून ऑनलाईन कॅसिनो आणि मटका जुगाराचे जाळे अत्यंत वेगाने पसरले आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या आमिषाला बळी पडणारी अल्पवयीन मुले आणि नवतरुण या दलदलीत खोलवर रुतत चालले आहेत. दररोज लाखो-करोडोंची उलाढाल या काळ्या बाजारात होत आहे.जुगारात पैसे हरल्यानंतर ते भागवण्यासाठी चोरी, घरफोडी, दमदाटी, आपापसात हाणामारी आणि भाईगिरी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कित्येक घरे आणि कुटुंबे आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाली असून परिसरातील महिला व ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे.
संजयनगर पोलिसांचे अभय की हप्त्यांचे गणित?
उघडपणे आणि धाब्यावर बसवून सुरू असलेल्या या ऑनलाईन कॅसिनो आणि मटका अड्ड्यांची माहिती स्थानिक पोलिसांना नाही, यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही. नागरिक वारंवार तक्रारी देऊनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने "पोलिसांचा या अवैध धंदेवाईकांना थेट वरदहस्त आहे का?" असा गंभीर संशय आता उघडपणे व्यक्त केला जात आहे. हप्त्यांच्या गणितात पोलीस प्रशासन सुस्त पडले असून ते गुन्हेगारांचे रक्षक बनले आहेत का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
पोलीस अधीक्षकांनी स्वतः धाड टाकून कंबरडे मोडावे!
स्थानिक पोलिसांकडून कोणतीही दाद मिळत नसल्याने संजयनगरमधील संतप्त रहिवाशांनी आता थेट सांगलीच्या पोलीस अधीक्षकांकडे आक्रमक मोर्चा वळवला आहे.
नागरिकांची मुख्य मागणी:
सांगलीच्या पोलीस अधीक्षकांनी स्वतः संजयनगर परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन गुप्त पाहणी करावी. स्थानिक पोलिसांच्या वरदहस्ताने चालणारे ऑनलाईन कॅसिनो आणि मटक्याचे अड्डे तात्काळ मुळासकट उद्ध्वस्त करावेत. अवैध धंदेवाईकांना पाठीशी घालणाऱ्या आणि हप्तेखाऊ अधिकाऱ्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करावी.
रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशारा
येत्या काही दिवसांत जर संजयनगर परिसरातील हे ऑनलाईन कॅसिनो आणि मटक्याचे जाळे समूळ नष्ट केले नाही, तर संपूर्ण संजयनगरचे रहिवासी, महिला व तरुण वर्ग रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. आता पोलीस अधीक्षक या अवैध धंद्यांचे कंबरडे मोडून संजयनगरला गुन्हेगारीमुक्त करणार की स्थानिक पोलिसांचे संशयास्पद मौन असेच कायम राहणार, याकडे संपूर्ण सांगली शहराचे लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.