🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली: धनादेश बाऊन्स प्रकरणी न्यायालयाचा मोठा निकाल; १.७० लाखांचा दंड आणि कारावासाची शिक्षा

सांगली: धनादेश बाऊन्स प्रकरणी न्यायालयाचा मोठा निकाल; १.७० लाखांचा दंड आणि कारावासाची शिक्षा


सांगली :- सांगली सॅलरी अर्नर्स को-ऑप. सोसायटीकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता धनादेश देऊन वेळकाढूपणा करणाऱ्या कर्जदाराला न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. कर्जफेडीसाठी दिलेला एक लाख ७० हजार रुपयांचा धनादेश बाऊन्सप्रकरणी सुनिल सुरेश बारंगुळे (रा.बार्शी, जि. सोलापूर) यांना तीन महिने सश्रम कारावास आणि एक लाख ७० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.


तसेच खटला दाखल केल्याच्या दिनांकापासून संबंधित रकमेवर ९ टक्के दराने व्याज देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्हे कार्यक्षेत्र असलेल्या दि. सांगली सॅलरी अर्नर्स को-ऑप. सोसायटीकडून बारंगुळे यांनी तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. ते पाटबंधारे उपविभाग, बार्शी येथे कार्यरत आहेत. कर्जाचे हप्ते वेळेत न भरल्याने ते थकबाकीदार झाले. संस्थेने वारंवार लेखी व तोंडी तसेच प्रत्यक्ष भेटून थकीत कर्जाची रक्कम भरण्याची मागणी केली. 

त्यानंतर बारंगुळे यांनी थकबाकीपोटी एक लाख ७० हजार रुपयांचा धनादेश संस्थेला दिला. मात्र, सदर धनादेश बँक खात्यात जमा केला असता खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो बाऊन्स होऊन परत आला. यानंतर संस्थेने वकिलामार्फत कायदेशीर नोटीस बजावून धनादेशाची रक्कम भरण्याची मागणी केली. मात्र, नोटीस मिळूनही संबंधित रक्कम अदा करण्यात आली नाही. त्यामुळे संस्थेने परक्राम्य लिखत अधिनियम, १८८१ मधील कलम १३८ अन्वये सांगली येथील मे. ज्युडिशिअल मॅजिस्ट्रेट प्रथम वर्ग यांच्या न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला. 

खटल्याच्या सुनावणीदरम्यान सादर करण्यात आलेले कागदोपत्री पुरावे, उलटतपासणी तसेच दोन्ही पक्षांच्या वकिलांचे युक्तिवाद विचारात घेऊन न्या. ए. आर. कल्हापुरे यांनी आरोपी सुनिल बारंगुळे यांना तीन महिने सश्रम कारावास व १ लाख ७० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच खटला दाखल केल्याच्या दिनांकापासून संबंधित रकमेवर ९ टक्के दराने व्याज फिर्यादी संस्थेस देण्याचे आदेश दिले, अशी माहिती ॲड्. विनायक झांबरे यांनी दिली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.