अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांनी गणपती मंदिरात येऊन आरती करणे, पुजाऱ्याशी चुकीच्या पद्धतीने बोलणे हे कृत्य हे चुकीचे असल्याचे आणि 1940 च्या संस्थान कायद्यानुसारच संस्थानाचे युवराज म्हणून आदित्यराजे यांची नियुक्ती केल्याचा खुलासा सांगली संस्थानचे अधिपती श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
मी आजारी असल्याचे बोलण्यात आले मात्र मी दोघांना लोळवेल इतपत माझ्या अंगात ताकत आहे असे म्हणत आपल्या आजारपणाच्या चर्चांना श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांनी पूर्णविराम दिला. गणेशोत्सवाच्याच काळात सांगलीच्या या ऐतिहासिक घराण्यातील कौटुंबिक आणि संस्थानाचा वाद चव्हाट्यावर आल्याने सांगलीसह संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
अभिनेत्री भाग्यश्री यांनी गणपती मंदिरात केलेले कृत्य हे चुकीचंच असल्याचे मत पुन्हा एकदा नोंदवले. भाग्यश्रीला अन्य दोन मुली प्रमाणेच आम्ही मानसन्मान देतो मात्र एकदा प्रतिष्ठापनेची पूजा झाल्यानंतर पुन्हा येऊन पूजा करणं हा प्रकार चुकीचा असल्याचंही विजय विजयसिंह राजे पटवर्धन म्हणाले. यापुढे संस्थानाचा युवराज म्हणून आदित्यराजेच काम पाहतील हा माझा निर्णय आहे,असा खुलासा संस्थानचे अधिपती विजयसिंह राजे पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत केला.
नेमका वाद काय?
सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानमध्ये ऐन गणपती उत्सवाच्या सुरुवातीला वाद उफाळून आला. गणपती पंचायतन संस्थानाच्या श्रींच्या उत्सव मूर्तीची आरती श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांच्या कन्या आणि प्रसिद्ध हिंदी अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांनी केली. सध्या या संस्थांचे सध्याचे युवराज आदित्यराजे पटवर्धन असतानाही अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांनी आरती करण्यावरून संस्थानच्या मॅनेजर आणि पुजाऱ्यांशी वादावादी केली. याचवेळी मंदिराचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर आणि भाग्यश्री यांच्यात शाब्दिक खडाजंगी रंगली. जी पूजा आदल्या दिवशी विजयसिंह राजे पटवर्धन यांनी केली होती, तीच पूजा दुसऱ्या दिवशी विजयसिंह राजे पटवर्धन यांची कन्या भाग्यश्री यांनी जाऊन केली. संस्थानच्या राजाकडे हे अधिकार असतात.4 वर्षांनंतर भाग्यश्रीने गणपती संस्थानमध्ये जात पुजाऱ्यांकडे जाऊन 'मला आरती करायची आहे' असे म्हणत बसल्या ठिकाणी टिचकी मारून उठवले. गुरुजींना उन्मत्तपणाने वागवले. अधिकाराची भाषा करत, चालीरीती मोडून मनमानीपणे वागत आरती करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर प्रसारमाध्यमांना विजयसिंह राजे पटवर्धन आजारी असल्याचे सांगत वडिलांना डावलून गणपतीची आरती केल्याने हा वाद आणखी उफाळला. अखेर आज पत्रकार परिषद घेत श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांनी आजारपणाच्या चर्चांना पूर्णविराम देत लेक व अभिनेत्री भाग्यश्रीने केलेल्या प्रकाराची जाहीर माहिती दिली. सांगलीतील श्री गणपती पंचायतन संस्थानचे उत्तर अधिकारी संस्थानाचे युवराज आदित्य राजे पटवर्धनच असतील हे त्यांनी पुन्हा एकदा नमूद केले. कन्येच्या वर्तनाबद्दल बोलताना विजयसिंहराजे यांनी पत्रकार परिषदेत खडे बोल सुनावले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.