🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्हा बँकेत जुन्यांनाच संधी, की वारसदारांची एण्ट्री

सांगली जिल्हा बँकेत जुन्यांनाच संधी, की वारसदारांची एण्ट्री

सांगली:-जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार असून, ११ सप्टेंबरला अंतिम मतदार प्रसिद्ध होईल. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय वातावरण तापत आहे. रिझर्व्ह बँकेने सलग १० वर्षांचा कार्यकाल झालेल्या संचालक पदावर राहण्यास बंदी घातली. मात्र, राज्य सरकारने सहकार कायद्यात याबाबत तरतूद केलेली नाही. त्यामुळे जिल्हा बँकेतील दिग्गज नेत्यांना दिलासा मिळाला. बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्यासह खासदार विशाल पाटील यांच्यासह नऊ विद्यमान संचालकांचा पुन्हा जिल्हा बँकेत येण्याचा मार्ग मोकळा झाला असला, तरी नेत्यांच्या वारसांना बँकेच्या सत्ताकारणात स्थान मिळवून देण्यासाठी पडद्यामागे मोर्चेबांधणी सुरू आहे.

सांगली जिल्हा बँकेच्या एकूण २१ संचालकपदांसाठी होणाऱ्या निवडणुकीत सहकारातील जुनी समीकरणे बदलण्याची शक्यता असून, नव्या चेहऱ्यांसह घराणेशाहीचे चित्रही ठळकपणे दिसणार आहे. विविध कार्यकारी सेवा संस्था, नागरी पतसंस्था, पणन, प्रक्रिया, दूध, औद्योगिक, गृहनिर्माण आणि मजूर संस्थांमधून प्रतिनिधींचे ठराव निश्चित झाले आहेत. ११ सप्टेंबरला अंतिम मतदारयादी जाहीर होणार आहे.

सध्या सांगली जिल्हा बँकेसह कोल्हापूर आणि सातारा जिल्हा बँकांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे विद्यमान अध्यक्ष मानसिंगराव नाईक, खासदार विशाल पाटील, माजी अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, संग्रामसिंह देशमुख, महेंद्र लाड, मोहनराव कदम, सुरेश पाटील आणि बाळासाहेब होनमोरे यांच्यासह आठ विद्यमान संचालकांना पुन्हा बँकेत येण्याची अडचण निर्माण झाली होती. परंतु, सहकार विभागाने कायद्यात तरतूद केली नसल्याने पुन्हा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बँकेची निवडणूक महाविकास आघाडीचे नेते आमदार जयंत पाटील, आमदार डॉ. विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांच्या पॅनेलविरोधात भाजपचे पॅनेल उभे राहणार असल्याचे चित्र आहे.

जिल्हा बँकेतील अनेक जागांवर नवे चेहरे येण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत तालुका विकास सोसायटीतून निवडणूक लढविणार आहेत, त्याबाबतचा ठराव झाला आहे. मिरजेचे आमदार सुरेश खाडे मिरज तालुक्यातून लढणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय विद्यमान उपाध्यक्षा जयश्री पाटील, संचालक व आमदार सत्यजित देशमुख, संग्रामसिंह देशमुख, पृथ्वीराज पाटील, चिमण डांगे हे पुन्हा लढण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

संचालकांना दहा वर्षांची अट लागू झालीच तर नवे चेहरे बँकेत येतील. विद्यमान अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांचे पुत्र विराज नाईक, जयंत पाटील यांचे पुत्र व राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, खासदार विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील, माजी आमदार मोहनराव कदम यांचे पुत्र शांताराम कदम अथवा नातू जितेश कदम, माजी आमदार सुमन पाटील, पलूस तालुक्यातून पतंगराव कदम यांचे नातू ऋषिकेश महेंद्र लाड अथवा रोहन लाड, संचालक बाळासाहेब होनमोरे यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या अस्मिता होनमोरे यांची नावे चर्चेत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.