🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बाबा आमटेंनी उभारलेल्या 'आनंद निकेतन'ची जबाबदारी आता दुसऱ्या संस्थेकडे? आमटे परिवाराचा मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?

बाबा आमटेंनी उभारलेल्या 'आनंद निकेतन'ची जबाबदारी आता दुसऱ्या संस्थेकडे? आमटे परिवाराचा मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?


समाजातील उपेक्षित घटकांना शिक्षणाची दारे खुली व्हावीत, या उद्देशाने ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय बाबा आमटे यांनी जवळपास 60 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या 'आनंद निकेतन' या शैक्षणिक संस्थेबाबत आमटे परिवाराने मोठा निर्णय घेतला आहे. 

संस्थेच्या व्यवस्थापनातून बाजूला होऊन एखाद्या सक्षम संस्थेकडे व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवण्याचा विचार आमटे परिवाराने केला आहे. आनंद निकेतनच्या शाळा आणि महाविद्यालयासमोर सध्या आर्थिक अडचणी आणि पायाभूत सुविधांशी संबंधित मोठी आव्हाने उभी आहेत. संस्थेच्या इमारतीची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून, इमारतीच्या पुनर्बांधणीची तातडीने आवश्यकता असल्याचे आमटे परिवाराने स्पष्ट केले आहे.

जीर्ण इमारतीमुळे दुर्घटनेचा धोका
उधई आणि इतर कारणांमुळे आनंद निकेतनच्या शैक्षणिक इमारतीची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याने भविष्यात कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संपूर्ण इमारतीची पुनर्बांधणी करणे अत्यावश्यक असल्याचे आमटे परिवाराने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी तब्बल 111 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती आमटे परिवाराने दिली आहे. मात्र, संस्थेवर आधीपासून असलेल्या विविध आर्थिक जबाबदाऱ्यांमुळे एवढा मोठा खर्च उचलणे संस्थेला सध्या शक्य नसल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
देणगीदारांकडून निधी उभारण्याचे प्रयत्न

इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी देणगीदार तसेच निधी उभारणीचे इतर पर्यायही तपासण्यात आले. मात्र, आवश्यक तेवढा मोठा निधी उपलब्ध करून घेणे शक्य होत नसल्याने आता व्यवस्थापनाची जबाबदारी एखाद्या सक्षम संस्थेकडे सोपवण्याचा पर्याय आमटे परिवाराकडून गांभीर्याने विचारात घेतला जात आहे.

जबाबदारी आता कोणत्या सक्षम संस्थेकडे जाणार?
आनंद निकेतनच्या शाळा आणि महाविद्यालयावर या आर्थिक संकटाचा परिणाम होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतला जात असल्याचे आमटे परिवाराने स्पष्ट केले आहे. आर्थिक अडचणींमुळे संस्था बंद पडू नये आणि समाजातील उपेक्षित घटकांच्या शैक्षणिक हितांना कोणत्याही प्रकारची बाधा पोहोचू नये, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे. आनंद निकेतन ही संस्था आमटे परिवारासाठी भावनिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असली, तरी सध्याच्या परिस्थितीत केवळ भावनिक विचार न करता व्यवहार्य विचार करणे आवश्यक असल्याचेही परिवाराने आपल्या निवेदनातून स्पष्ट केले आहे. बाबा आमटे यांच्या विचारातून आणि कार्यातून उभ्या राहिलेल्या आनंद निकेतनच्या पुढील वाटचालीची जबाबदारी आता कोणत्या सक्षम संस्थेकडे जाणार, याकडे चंद्रपूरसह राज्याचे लक्ष लागले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.