नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. नाशिक शहर गुन्हे शाखेने अखेर मनीषा जेजुरकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गंभीर आरोपाखाली त्यांचे पती तथा जिल्हा शासकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नीलेश जेजुरकर यांना शुक्रवारी (१८ सप्टेंबर) द्वारका सर्कल परिसरातून अटक केली आहे.
ते मागील साडे सहा महिन्यांपासून फरार होते. सहा महिन्यांपूर्वी घडली होती घटना गंगापूर रोडवरील डी. के. नगर येथील रेवती ब्ल्यू अपार्टमेंटमध्ये ६ मार्च २०२६ रोजी डॉ. मनीषा जेजुरकर (वय ४०) यांचा राहत्या घरी मृत्यू झाला होता. सुरुवातीला या प्रकरणात गंगापूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, मनीषा यांच्या बहिणीने केलेल्या गंभीर तक्रारीनंतर कौटुंबिक छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी डॉ. नीलेश जेजुरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयापर्यंत जामिनासाठी धडपड, पण...
गुन्हा दाखल झाल्यापासून डॉ. नीलेश फरार होता. तो अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात कायदेशीर लढाई लढत होता. मात्र नाशिक जिल्हा सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर या निर्णयाविरोधात नीलेशने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, १७ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयानेही त्याचा अर्ज फेटाळला. सर्वोच्च न्यायालयाकडूनही जामीन नाकारल्याने त्याचे सुटकेचे सर्व मार्ग बंद झाले. यामुळे त्याने पोलिसांकडे सरेंडर करणं गरजेचं होतं, मात्र त्याने तसं केलं नाही.अखेर गुन्हे शाखेच्या युनिट-१ ने सापळा रचून डॉ. नीलेश जेजुरकर याला द्वारका परिसरातून ताब्यात घेतलं. डॉ. मनीषा यांच्या माहेरच्या मंडळींनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत डॉ. नीलेशवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. २०२१ पासून डॉ. नीलेश हे पत्नीच्या गरजा आणि भावनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होता. घरातील प्रत्येक महत्त्वाचा निर्णय घेताना तो अन्य एका महिला डॉक्टरचा सल्ला घेत असे, ज्यामुळे दांपत्यामध्ये सतत तीव्र वाद होत होते. सततच्या या मानसिक त्रासाला कंटाळूनच डॉ. मनीषा यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या गुन्हे शाखा या प्रकरणी डॉ. नीलेश याची कसून चौकशी करत असून त्यांना लवकरच न्यायालयात हजर केले जाणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.