🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्हा बँक निवडणुकीचा २३ सप्टेंबरला बिगुल वाजणार, मोर्चेबांधणीला सुरुवात

सांगली जिल्हा बँक निवडणुकीचा २३ सप्टेंबरला बिगुल वाजणार, मोर्चेबांधणीला सुरुवात


सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणुकीचा संभाव्य कार्यक्रम सहकार विभागाने तयार करून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविला आहे. प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यानंतर अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. संभाव्य वेळापत्रकानुसार २३ सप्टेंबरला निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. त्याच दिवसापासून निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. 

जिल्हा बँकेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीनंतर आता नव्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी हालचालींना वेग आला आहे.  अंतिम मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यानंतर पंधरा दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता गृहीत धरून सहकार विभागाने निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक तयार केले आहे. हे वेळापत्रक आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. संभाव्य निवडणूक कार्यक्रमानुसार २४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 
अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेनंतर ५ ऑक्टोबरला अर्जांची छाननी होण्याची शक्यता आहे. छाननीनंतर निवडणुकीतील चित्र अधिक स्पष्ट होणार असून, ६ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत राहणार आहे. अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी निश्चित होईल. त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाची तयारी सुरू होणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी संभाव्य कार्यक्रमानुसार १ नोव्हेंबरला मतदान घेण्यात येणार आहे. त्यानंतर ३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा बँकेच्या नव्या संचालक मंडळाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. 
२४४५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार या निवडणुकीसाठी एकूण २ हजार ४४५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला अधिकृत गती मिळाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील चव्हाण जिल्हा बँक निवडणुकीसाठी जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रमाला प्राधिकरणाची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर त्यांच्या देखरेखीखाली निवडणुकीची पुढील प्रक्रिया पार पडणार आहे.


जिल्हा बँक निवडणुकीचा संभाव्य कार्यक्रम
निवडणूक कार्यक्रम प्रसिद्धी : २३ सप्टेंबर
आचारसंहिता लागू : २३ सप्टेंबर
उमेदवारी अर्ज दाखल : २४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर
उमेदवारी अर्जांची छाननी : ५ ऑक्टोबर
अर्ज माघारीची मुदत : ६ ते २१ ऑक्टोबर
मतदान : १ नोव्हेंबर
मतमोजणी : ३ नोव्हेंबर
एकूण मतदार : २ हजार ४४५


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.