कोल्हापूर : गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणी मोका कायद्यांतर्गत कारवाई केलेल्या स्वप्निल पाटील गँगमधील तिघांना करवीर पोलिसांनी मंगळवारी (दि. ८) पुन्हा अटक केली. अनिल प्रकाश टिपुगडे, आश्विनी गजानन शिंदे, सुनील प्रकाश पाटील अशी त्यांची नावे आहेत. बुधवारी (दि. ९) त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. जुलै २०२६ मध्ये भोगावती साखर कारखान्याच्या क्वॉटर्समध्ये गर्भलिंग निदान आणी गर्भपात रॅकेटचा करवीर पोलिसांनी पर्दाफाश करून बोगस डॉक्टर, एजंट, डॉक्टर अशा ११ जणांवर 'मोका'अंतर्गत कारवाई केली.
स्वप्निल केरबा पाटील, दत्तात्रय कृष्णात पाटील, श्रीमंत तानाजी पाटील, विजय लक्ष्मण कोळसकर, ओंकार गोरखनाथ कराळे, प्रशांत वसंत जाधव, सुनील प्रकाश पाटील, अनिल प्रकाश टिपुगडे, शिवप्रसाद सत्ताप्पा महादेव पाटील, आश्विनी गजानन शिंदे अशी त्यांची नावे आहेत. गुन्हा विशेष मोका न्यायालयाकडे वर्ग झाल्यामुळे करवीर पोलीस उपअधीक्षक आप्पासो पोवार, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पुन्हा तपास सुरू केला आहे. मंगळवारी तिघांना अटक केली असून, त्यांनी किती रुग्णांचे गर्भलिंग निदान केले, त्यांच्याकडून किती पैसे घेतले, गर्भपात कोठे केले, याची चौकशी सुरू केली आहे. 'मोका'अंतर्गत कारवाईमुळे अकरा जणांना टप्प्याटप्याने कारागृहातून पुन्हा ताब्यात घेणार आहे. त्यांच्याकडे रुग्ण, गर्भलिंग आणि गर्भपातासह गर्भाची विल्हेवाट कोठे केली, याची चौकशी होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.