पुणे : गणेशोत्सवाच्या तोंडावर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा भीषण प्रकार समोर आला असून, दुधामध्ये प्रथमच अल्फॉक्स-२००' (Alphox-200) ' हे अत्यंत घातक रसायन भेसळीसाठी वापरले जात असल्याचे आढळले आहे.
महाराष्ट्र राज्य सार्वजनिक प्रयोगशाळेने ही माहिती दिली आहे. दुधामध्ये आतापर्यंत केवळ डिटर्जंट किंवा युरिया यांचा भेसळीसाठी वापर केला जात होता. मात्र, राज्यात प्रथमच अल्फॉक्स-२००' हे रसायन दुधात आढळले आहे. दुधामध्ये काही दिवसांपूर्वी हे रसायन आढळल्याची माहिती प्रयोगशाळेतील सूत्रांनी दिली.
प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अल्फॉक्स' हे प्रामुख्याने कापड उद्योग, चर्म उद्योग आणिऔद्योगिक डिटर्जंट म्हणून वापरले जाणारे रासायनिक द्रव आहे. हे रसायन पाणी आणि तेलाला एकत्र बांधून ठेवण्याचे काम करते. याच गुणधर्माचा गैरफायदा घेऊन भेसळखोर पाणी, थोडे तेल आणि अल्फॉक्स एकत्र करून हुबेहूब पांढरे शुभ्र कृत्रिम दूध तयार करतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.
वर्ख, अखाद्य रंगापासून सावध राहण्याच्या सूचना
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाईंना मागणी असते. मिठाई आकर्षक दिसण्यासाठी त्यावर चांदीचा वर्ख लावला जातो. परंतु, शुद्ध चांदी महाग असल्याने अनेक व्यापारी त्याला पर्याय म्हणून ॲल्युमिनियमच्या पापुद्र्याचा वापर करतात. ही भेसळ साध्या डोळ्यांनी ओळखणे कठीण असते. तसेच, ते आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. तसेच, मिठाईमध्ये वापरले जाणारे रंगही भेसळयुक्त असण्याची शक्यता असल्याने अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना दक्षतेचे आवाहन केले आहे.
भेसळीचा वर्ख कसा ओळखावा?
अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अस्सल चांदीचा वर्ख हा स्पर्श केल्यास हाताला चिकटणारा आणि त्याचे पापुद्रे लगेच वेगळे होणारा असतो, तर ॲल्युमिनियमचा वर्ख हा किंचित जाड अन् हाताला चिकटला, तरी लवकर पापुद्रा पडत नाही. चांदीचा वर्ख हा लगेच विरघळतो, तर ॲल्युमिनियमचा वर्ख विरघळत नाही.
जाणकारांच्या प्रतिक्रीया…
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिठाईमध्ये भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खास करून अखाद्य रंगांमुळे कुठलीही पोषकमूल्ये मिळत नाहीत. ग्राहकांनी अधिक सजग राहण्याची गरज असून, काही त्रुटी आढळल्या, तर त्वरित प्रशासनाकडे तक्रार दाखल करावी. अशी माहीती अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त .दि. वा. भोगावडे यांनी दिली.अखाद्य रंग आणि वर्ख वापरल्याने शरीराला काय अपाय होऊ शकतो ययावर अधिक माहीती देताना डॉ. डॉ. अविनाश भोंडवे सांगातात, अगदी कर्करोग, यकृत, मूत्रपिंड या अवयवांवर दुष्परिणाम होऊ शकतात. मात्र, अन्न व ओषध प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून भेसळीविरोधात ज्या मोहिमा हाती घेतल्या आहेत. त्यामुळे यंदा तरी बाजारात मिठाईमध्ये फारशी भेसळ दिसणार नाही, अशी अपेक्षा आहे.
व्यावसायिक शंतनु आठवले सांगतात की…
सणासुदीच्या काळात सुरक्षित पाकीटबंद आणि भारतीय अन्न सुरक्षा, मानक प्राधिकरण यांची नोंदणी असणारेच अन्न व मिठाईची विक्री प्रशासनाने बंधनकारक केली आहे. त्यामुळे आता केवळ मोठेच नाही, तर छोटे व्यवसाय करणारे विक्रेतेही जागरुक झाले असून, मिठाई बाजारात लाडू, जिलबीसारख्या मिठाई रंगमुक्त झाल्या आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.