🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

१७ सप्टेंबरला गौरी आवाहन तर १८ सप्टेंबरला होणार गौरी पूजन; पाहा संपूर्ण वेळापत्रक

१७ सप्टेंबरला गौरी आवाहन तर १८ सप्टेंबरला होणार गौरी पूजन; पाहा संपूर्ण वेळापत्रक


पुणे : गणेशोत्सवाच्या मंगलमय आणि भक्तिमय सोहळ्याला सोमवार, १४ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. यंदा गणेशोत्सव १२ दिवसांचा असून, गणेश चतुर्थीच्या दिवशी घरगुती गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी दुपारी १ वाजून ५१ मिनिटांपर्यंत मुहूर्त असल्याची माहिती पंचांगकर्त्यांनी दिली आहे.

गणेश चतुर्थीच्या दिवशी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४ वाजून ५० मिनिटांपासून दुपारी १ वाजून ५१ मिनिटांपर्यंत घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येणार आहे. यासाठी भद्रा किंवा विष्टीसारखे कुयोग टाळण्याची अथवा विशिष्ट मुहूर्ताची प्रतीक्षा करण्याची गरज नसल्याचे पंचांगकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना मध्याह्नानंतरही करता येणार आहे. तसेच गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी किंवा चतुर्थीच्या दिवशी सकाळीच मूर्ती घरी आणणे आवश्यक नसल्याचेही पंचांगकर्त्यांनी सांगितले. गणेशमूर्ती आठ ते दहा दिवस आधी दुकानातून आणून घरात ठेवता येते.

यंदा हरितालिका तृतीया आणि श्री गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्याने भाविकांसाठी हा विशेष योग आहे. सोमवारी सूर्योदयाच्या वेळी तृतीया, तर मध्याह्नकाळात चतुर्थी तिथी असल्याने दोन्ही व्रते एकाच दिवशी येत आहेत. सोमवारी सकाळी ७ वाजून ७ मिनिटांनी तृतीया समाप्त होणार आहे. मात्र, हरितालिका पूजन तृतीया समाप्त होण्यापूर्वीच करावे किंवा त्यानंतरच गणेशपूजन करावे, असे बंधन नाही. तृतीया समाप्त होण्यापूर्वी किंवा त्यानंतरही हरितालिका पूजन करता येणार आहे. तसेच सकाळी ७.०७ वाजण्यापूर्वीदेखील पार्थिव गणेशाचे पूजन करता येईल.

गणेशोत्सवातील गौरी पूजनाबाबतही पंचांगकर्त्यांनी माहिती दिली आहे. १७ सप्टेंबर रोजी अनुराधा नक्षत्रावर सायंकाळी ७ वाजून ५४ मिनिटांपर्यंत कधीही गौरी आवाहन करता येईल. ज्येष्ठा नक्षत्र मध्याह्नी असलेल्या दिवशी गौरी पूजन करण्याची परंपरा असल्याने १८ सप्टेंबर रोजी गौरी पूजन होणार आहे. मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन करण्याची परंपरा असल्याने १९ सप्टेंबर रोजी दिवसभरात कधीही गौरी विसर्जन करता येणार आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.