श्री गणरायाच्या उत्सवातून कृष्णामाईच्या संवर्धनाकडे: सांगलीत '३६५ मंडळे जोडूया – ३६५ दिवस कृष्णामाईला जपूया' या अनोख्या संकल्पाचा शुभारंभ
सांगली :- गणेशोत्सवाच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून सांगलीत नदी संवर्धनाची एक नवी चळवळ आकारास येत आहे. श्री गणपती पंचायतन संस्थान, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका आणि कृष्णामाई महोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने "श्री गणरायाच्या उत्सवातून कृष्णामाईच्या संवर्धनाकडे" हा उपक्रम १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ दरम्यान राबवला जात आहे. या अभियानांतर्गत '३६५ मंडळे जोडूया – ३६५ दिवस कृष्णामाईला जपूया' या विशेष संकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
काय आहे '३६५ दिवस' उपक्रमाचे स्वरूप?
मंडळांची नोंदणी: सांगली शहरातील प्रमुख ३६५ गणेशोत्सव मंडळांची या अभियानासाठी अधिकृत नोंदणी केली जाईल.वार्षिक जबाबदारी: प्रत्येक मंडळाकडे वर्षातील एका विशिष्ट दिवसाची जबाबदारी सोपवली जाईल.अखंड सेवा: ते मंडळ त्या दिवशी कृष्णामाईच्या तटावर महाआरती, परिसर स्वच्छता अभियान, पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषणमुक्तीचा संकल्प पूर्ण करेल. यामुळे वर्षाचे ३६५ दिवस नदीची सेवा आणि स्वच्छता अखंडपणे सुरू राहणार आहे.
वाराणसीच्या अर्चकांच्या हस्ते भव्य महाआरती
कृष्णामाई महोत्सव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री महेंद्र चंडाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत सांगलीतील कृष्णामाई सरकारी घाटावर दररोज संध्याकाळी ८.०० ते ९.०० या वेळेत भव्य आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. वाराणसी येथून खास बोलावण्यात आलेल्या अर्चकांच्या हस्ते श्री गणपती, श्री कृष्णामाई आणि श्री गंगामाई यांची ही महाआरती संपन्न होणार आहे.
नागरिक व संस्थांना सहभागाचे आवाहन
कृष्णामाईप्रती निष्ठा जपणे, सामाजिक जबाबदारीचे भान ठेवणे आणि भावी पिढीसाठी नदीचे पावित्र्य टिकवणे हा या मोहिमेचा मूळ हेतू आहे. केवळ गणेशोत्सव मंडळेच नव्हे, तर सामाजिक, धार्मिक, सांप्रदायिक संस्था, उद्योजक, कला-क्रीडा क्षेत्रातील संघटना, शासकीय व निमशासकीय कार्यालये आणि सर्व सांगलीकरांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. सांगलीच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेला पर्यावरणाची जोड देणारा हा उपक्रम शहरासाठी एक आदर्श ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.