🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांची धडक कारवाई: खाजगी सावकारी व गुंडगिरी करणाऱ्या धुमाळ टोळीला सांगली जिल्ह्यातून २ वर्षांसाठी हद्दपार

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांची धडक कारवाई: खाजगी सावकारी व गुंडगिरी करणाऱ्या धुमाळ टोळीला सांगली जिल्ह्यातून २ वर्षांसाठी हद्दपार


सांगली : गणेशोत्सवाच्या काळात शहरात शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवू शकणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढण्यासाठी सांगली पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. सांगली शहरात बेकायदेशीर खाजगी सावकारी, अपहरण आणि खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कोमल रामचंद्र धुमाळ टोळीवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये कारवाई करत, सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी धुमाळ कुटुंबातील ३ जणांना सांगली जिल्ह्यातून तब्बल २ वर्षांच्या कालावधीसाठी हद्दपार (तडीपार) करण्याचे आदेश जारी केले आहेत.

​तडीपार करण्यात आलेले आरोपी:
१. कोमल रामचंद्र धुमाळ (वय ३० वर्षे) – टोळी प्रमुख
२. अमित रामचंद्र धुमाळ (वय ३५ वर्षे)
३. वैशाली रामचंद्र धुमाळ (वय ५१ वर्षे)
(सर्व रा. सुतार प्लॉट नं. १४, बाबर चाळ, पत्रकारनगर, कोल्हापूर रोड, सांगली)
​गुन्ह्यांचे स्वरूप व पार्श्वभूमी:

धुमाळ टोळीविरुद्ध सन २०२२ ते २०२५ या कालावधीत सांगली शहर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे नोंदवले गेले आहेत. यात प्रामुख्याने:

बेकायदेशीर खाजगी सावकारी करून व्याजापोटी नागरिकांची अडवणूक करणे.

​हत्यारांचा धाक दाखवून व जिवे मारण्याची धमकी देऊन खंडणी वसूल करणे.

​व्याजाच्या पैशांसाठी अपहरण करणे.

​बेकायदेशीर जमाव जमवून घातक हत्यारांनी दुखापत करणे व गृह-अतिक्रमण करणे.

​कायद्याचा कसलाही धाक न बाळगणाऱ्या या टोळीची मोठी दहशत निर्माण झाली होती.

अशी झाली कायदेशीर प्रक्रिया:
या टोळीच्या वाढत्या कारवाया लक्षात घेता, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ नुसार हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सदर प्रस्तावाची चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर) संदीप भागवत यांच्याकडे सोपवली. चौकशी अधिकारी यांनी सादर केलेला अहवाल, टोळीवर दाखल गुन्हे, प्रतिबंधक कारवाई आणि सद्यस्थितीचा सखोल विचार करून, नैसर्गिक न्यायतत्त्वाचा विचार करत सलग सुनावणीनंतर हा हद्दपारीचा अंतिम आदेश पारित करण्यात आला.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली. यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर यांच्यासह अंमलदार बसवराज शिरगुप्पी, दिपक गड्ढे, श्रीपाद शिंदे, संदीप ननवरे व सिकंदर तांबोळी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ​गणेशोत्सवाच्या काळात गुन्हेगारी टोळ्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सांगली पोलिसांचा हा इशारा असून, कायदा हातात घेणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.