🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अंबोलीत पर्यटनाचा आनंद बेतला जिवावर! धबधब्याखाली भिजताना थेट अंगावर साप कोसळल्याचा प्रकार

अंबोलीत पर्यटनाचा आनंद बेतला जिवावर! धबधब्याखाली भिजताना थेट अंगावर साप कोसळल्याचा प्रकार


गणपती आगमनासोबतच पावसाने पुन्हा जोर धरल्याचं चित्र शनिवारपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पाहायला मिळत आहे. कोकण किनारपट्टी भागातही पुढील काही दिवसांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला जात असल्याने पुन्हा एकदा मान्सून पिकनिक आणि पर्यटनाला बहार आली आहे. 

असं असतानाच पर्यटन करताना काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे हे अधोरेखित करणारा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये धबधब्याखाली उभ्या असलेल्या कुटुंबावर पाण्यासोबत साप पडल्याचं दिसत आहे. साप पडल्यानंतर पुढे काय झालं जाणून घ्या...

सिंधुदुर्गमधील आंबोली धबधब्यावर घडलं काय?
व्हायरल होत असलेला सदर व्हिडीओ हा सिंधुदुर्गमधील आंबोली धबधब्यावरील आहे. या धबधब्याखाली पर्यटक भिजण्याचा आनंद घेत असताना, मौज करत असताना अचानक वरून पाण्यासोबत साप कोसळला. विशेष म्हणजे हा साप पडला त्यावेळी खाली तीन महिला आणि एक पुरुष भिजण्याचा आनंद घेत होते. या पुरुषाच्या हातात एक लहान बाळ असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. धबधब्याचं पाणी पडत असतानाच अचानक किंचाळण्याचा आवाज येतो आणि व्हिडीओ शूट करणाऱ्यांपैकीच एकजण हिंदीत साप पडला, साप पडला असं ओरडतो. त्यानंतर इतर लोकांचं या सापाकडे लक्ष जातं. मात्र तोपर्यंत तो साप दगडांमधील फटींमधून निघून जातो.

तो साप कोब्रा?

अचानक वरून भला मोठा साप कोसळल्याने सगळ्यांचीच भंबेरी उडाली आणि उपस्थितांनी आरडाओरड केला. साप पडतानाचा व्हिडिओ मोबाईल कॅमेमध्ये कैद झाला आहे. दोन दिवसांपूर्वीची ही घटना असून सध्या हा व्हिडिओ सोशल माध्यमांवर वायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून अनेकांची गाळण उडाली. "खूप मोठा साप आहे", "वरुन पडला आहे हा साप", "कोब्रा आहे असं वाटतंय" असं उपस्थित लोक हा साप पाहत म्हणत आहेत.

नशिबाने चावला नाही
नशिबाने या सापाने कोणाला दंश केला नाही असं म्हणत पालकांनी लहान मुलांना पर्यटनस्थळी घेऊन गेल्यानंतर भान बाळगलं पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. काहींना धबधब्यासारख्या धोकादायक ठिकाणी अशाप्रकारे एका हातात बाळाला कडेवर घेऊन जाण्याची काय गरज आहे असा सवालही उपस्थित केला आहे. अशा ठिकाणी दगड फार निसरडे असता. चुकून पाय घसरला तरी अनर्थ होईल असं म्हणत पालकांनीच आपल्या उत्साहावर संयम ठेवणं फार गरजेचं असल्याचं मत अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर व्यक्त केलं आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट करुन नक्की कळवा.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.