नागपूर: १ जानेवारी ते ८ सप्टेंबर या कालावधीत शहरात एकूण ७३७ अपघात झाले. यापैकी १६२ अपघात हे प्राणांतिक होते. यात तब्बल १७१ जणांना प्राण गमवावे लागले. मागिल वर्षीच्या तुलनेत प्राणांतिक अपघातांचा टक्काही ४२ ने कमी झाला.
या अपघाती मृत्यूला आवर घालण्यात पोलिसांना २२ टक्क्यांचे यश आले असले तरी याला आणखी आळा घालणे आणि अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या धोकादायक वाहन चालविण्याच्या प्रकारांवर वेसण घालणे हे वाहतूक शाखेसमोरचे आव्हान कायम आहे. त्याचा सामना करण्यासाठी पोलिसांनी हाती घेतलेल्या कारवाईला न्यायालयानेही सकारात्कम दाद दिली आहे.चालू वर्षात दाखल अपघाताच्या एकूण प्रकरणांपैकी न्यायालयाने २६ प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलांच्या पालकांना दोषी ठरवत दणका दिला आहे. न्यायालयाने दोषसिद्ध ठरलेल्या प्रकरणात मोटर वाहन कायद्यांतर्गत ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला असून १२ महिन्यांसाठी वाहन चालविण्याच्या परवान्यावर रद्द किंवा अपात्रतेची कडक कारवाई केली आहे.
कायदेशीर तरतुदींनुसार झालेली कारवाई: यात काही पालकांना न्यायालयाने कलम १९९-ए (Motor Vehicles Act)नुसार अल्पवयीन पाल्याला वाहन दिल्याबद्दल २५,००० रुपयांचा दंड ठोठावला. शिवाय कलम १९९ (४) (Motor Vehicles Act): १२ महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स रद्द किंवा अपात्र ठरवण्याची कारवाई केली.
गंभीर अपघातांचा टक्का १७ ने वाढला
शहरात गेल्या वर्षी एकूण ३२३ गंभीर अपघात घडले होते. चालू वर्षी या अपघांची संख्या १७ ने वाढून ती ३४० वर पोहोचली. रस्ता अपघातांमध्ये गंभीर झालेल्यांच्या संख्येतही गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पाचने घट झाली. तर किरकोळ अपघातांचा टक्काही गेल्या वर्षीच्या २४६ वरून घटत २१३ वर घसरला. अपघातांमध्ये किरकोळ जखमी झालेल्यांची संख्याही ३३६ वरून २७६ पर्यंत कमी करण्यात वाहतूक शाखेला यश आले.
पालकांनो ही खबरदारी घ्या….!
अल्पवयीन मुलांमध्ये वाहन चालवण्यासाठी आवश्यक असलेली शारीरिक व मानसिक परिपक्वता नसते . त्यांच्याकडे वाहन चालवण्यासाठी वैध परवानाही नसतो. त्यामुळे मुलांना वाहनाची चावी देणे हे मुलांच्या आणि रस्त्यावरून जाणाऱ्या इतर नागरिकांच्या जीवासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यास देणाऱ्या पालक आणि वाहनमालकांविरुद्ध भविष्यातही अशीच कठोर कायदेशीर कारवाई चालू राहील, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे. नागरिकांनी आणि पालकांनी आपल्या पाल्यांना वाहने न देता पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन नागपूर शहर वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.