"तुझ्यामुळेच मराठ्यांची वाट लागली!" जरांगेंचा विखे-पाटलांवर थेट हल्लाबोल; 'उपोषण मागे घ्या'चा सल्ला भोवला!
अंतरवाली सराटी (जालना) : राज्य सरकारने अनेक सकारात्मक निर्णय घेऊनही मनोज जरांगे पाटील यांचे समाधान होत नाही. आता सरकारचे शिष्टमंडळ त्यांच्याशी चर्चा करणार नाही, अशी कठोर भूमिका मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतल्यानंतर जरांगे पाटील चांगलेच संतापले आहेत.
जरांगे पाटील यांनी विखेंचा थेट एकेरी शब्दात उल्लेख करीत तुला अंतरवालीला बोलावले नव्हते, तू नाही आला तरी फरक पडत नाही, तूच मराठा समाजाचे वाटोळे केले, मराठा उपसमितीचा आतापर्यंतचा सर्वात निष्क्रिय अध्यक्ष आहे, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी हल्ला चढवला.
मराठा समाजाच्या दृष्टीने सरकारला जे निर्णय घेणे शक्य होते ते निर्णय घेतले, आता मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करावे, अशी सूचना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. तसेच जरांगे पाटील यांच्याशी सरकारी शिष्टमंडळ आता चर्चा करणार नाही, असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारच्या भूमिकेमुळे जरांगे पाटील चांगलेच संतापले.
विखेंमुळेच मराठ्यांचे वाटोळे झाले, मराठा उपसमितीचा आतापर्यंतचा सर्वात निष्क्रिय अध्यक्ष
जरांगे पाटील म्हणाले, "सरकार म्हणते आहे की आमच्याकडे पर्याय नाही. कुणबी प्रमाणपत्र रद्द करणे, बावनकुळेंचे ऐकणे हेच पर्याय आहेत का? खरे तर राधाकृष्ण विखेंमुळेच मराठा समाजाचे वाटोळे झाले. अंतरवालीत तू येऊ नको, तुला कोणी बोलावले नव्हते. एकनाथ शिंदे यांच्या काळात आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण मिळाले, विखे-फडणवीसांनी काय केले?" असा सवाल त्यांनी विचारला.
समजून घ्यायला सरकार काय बाप आहे का आमचा?
विखे पाटील म्हणतात की सरकारची भूमिका समजून घ्या. समजून घ्यायला सरकार काय बाप आहे का आमचा? मराठ्यांचे वाटोळे करणारा विखे निष्क्रिय मंत्री आहे. तुम्ही मराठा समाजाच्या आंदोलकांना हात तर लावून दाखवा, तुम्हाला उभे राहायला जागा राहते का हे बघा. विखेंनी फडणवीसांचे स्वप्न पूर्ण केले. विखेंनी मराठा क्रांती मोर्चा फोडला. विखे सोडून अजून दोन मंत्री आमदार मराठ्यांच्या विरोधात आहेत, असेही जरांगे पाटील म्हणाले.
मी सगळ्यांना गुडघ्यावर आणणार
नगर जिल्ह्यातले खूप नेते मला सांगत होते की विखे दगाबाज माणूस आहे. पण तो सध्या हतबल माणूस आहे, हे मला जाणवते आहे. समाजाची बाजू सोडून तो सरकारची बाजू मांडत आहे. त्यांच्या कंबरड्यावर पाय देण्याची आमची क्षमता आहे. मी सगळ्यांना गुडघ्यावर आणणार, असेही जरांगे म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.