कर्मवीर नागरी पतसंस्थेची पायाभरणी भक्कमच; उठणाऱ्या पुड्या अन् कंड्यांचा संस्थेच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम होणार नाही!
सांगली :- शहरातील अग्रगण्य आणि हजारो सभासदांचा विश्वास जपणाऱ्या 'कर्मवीर नागरी पतसंस्थे'च्या स्थैर्याबद्दल काही वर्तुळातून अनर्गल चर्चा आणि कपोलकल्पित बातम्या पसरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या एका ज्येष्ठ सभासदाने सर्व अफवांचा स्पष्ट शब्दांत समाचार घेतला आहे. "कर्मवीर पतसंस्थेचा पाया अत्यंत भक्कम आहे; काही अंतर्गत वाद-विवाद सोडल्यास संस्थेच्या आर्थिक क्षमतेवर आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा अधिकार कोणालाही नाही," असा थेट आणि आक्रमक इशारा या सभासदाने नाव न छापण्याच्या अटीवर 'सांगली दर्पण'शी बोलताना दिला आहे.
दृष्ट लागण्याइतकी मोठी अन् भक्कम संस्था!
पतसंस्थेच्या वाटचालीवर आणि सभासदांच्या विश्वासावर भाष्य करताना हा सभासद म्हणाला, "कर्मवीर नागरी पतसंस्था आज ज्या भव्य स्वरूपात उभी आहे, ती तिने कमावलेल्या विश्वासार्हतेमुळेच! संस्था एवढी मोठी आणि यशस्वी झाली आहे की, तिला कोणाची तरी दृष्ट लागल्यासारखी स्थिती निर्माण केली जात आहे. परंतु, प्रत्यक्षात परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. सभासदांनी, ठेवीदारांनी मनात कोणतीही शंका अथवा भीती बाळगण्याचे अजिबात कारण नाही."
संचालक मंडळ पूर्णपणे सक्षम; उपद्व्यापींना सडेतोड उत्तर!
काही घटकांकडून 'संस्था कोण वाचवणार?' असा निष्कारण आव आणला जात असल्याचा खरपूस समाचार घेत त्यांनी सांगितले की, "संस्था वाचवण्याची भाषा करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी—हे विद्यमान संचालक मंडळ अत्यंत सक्षम आणि अनुभवी आहे. संस्थेला कोणत्याही संकटातून सुखरूप बाहेर काढण्याची आणि तिचे स्थैर्य अबाधित ठेवण्याची ताकद या संचालक मंडळात निश्चितच आहे. त्यामुळे कोणीही उगीच भलते-सलते उपद्व्याप करून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करू नये. अशा वावड्या आणि पेसलेल्या बातम्यांमुळे या खंबीर संस्थेला काहीही फरक पडणार नाही."
ठेवीदारांचे पैसे शंभर टक्के सुरक्षित!
अनेक चढ-उतार आणि वाद-विवादांमधूनही पतसंस्थेने आपली विश्वासार्हता कशी टिकवून ठेवली आहे, हे सर्व सभासदांनी जवळून पाहिले आहे. त्यामुळे पतसंस्थेतील प्रत्येक ठेवीदाराची ठेव ही पूर्णपणे सुरक्षित आहे. कोणीही कोणत्याही अफवांना बळी न पडता संस्थेच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असा विश्वासही या सभासदाने 'सांगली दर्पण'च्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
बातमीतील सर्व दावे आणि माहिती सांगली दर्पणला मिळालेल्या विशेष सूत्रांच्या आधारे आधारित आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.