सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाने आता केवळ शेतीच नव्हे, तर गावाचा वैवाहिक समतोलही पूर्णपणे बिघडवला आहे. माढा तालुक्यातील तुळशी गावात पाणी नाही म्हणून शेकडो तरुणांची लग्ने रखडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल १०७ एकर जमिनीचा मालक असूनही मुलगी मिळत नसल्याची हतबल कहाणी एका तरुणाने मांडली आहे.
दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या माढा तालुक्यातील तुळशी गावातून एक अत्यंत गंभीर सामाजिक समस्या समोर आली आहे. गावात पाणी नाही म्हणून या गावातील तरुणांना कोणी मुलगी द्यायला तयार नाही. याच गावातील राहुल गव्हाणे हा तरुण याचे जिवंत उदाहरण आहे. राहुलचे वय ३५ वर्षे ओलांडले आहे, त्याच्याकडे १०७ एकर जमीन, स्वतःचे घरदार आणि चांगला जमीन-जुमला आहे; मात्र तरीही त्याचे लग्न जुळत नाहीये. उच्चशिक्षित आणि 'आयटीआय' (ITI) डिप्लोमा केलेला राहुल पूर्वी पुण्यात १६ हजार रुपयांच्या नोकरीवर होता. परंतु शेती सांभाळण्यासाठी तो नोकरी सोडून गावात परतला; मात्र आता पाण्याअभावी त्याला कोणीही मुलगी द्यायला तयार नाही.
आपली व्यथा मांडताना राहुल सांगतो, "माझ्याकडे १०७ एकर जमीन आहे, मी उच्चशिक्षित आहे, पण गावात पाणी नाही म्हणून माझे लग्न होत नाही. पाहुणे येतात, शेतजमीन बघतात आणि नंतर फोनच करत नाहीत. माझ्यासारख्याची ही अवस्था असेल तर गोरगरीब मुलांचे काय होणार? सरकारने आमचे गाव विकत तरी घ्यावे किंवा आम्हाला पाणी तरी द्यावे..."
विशेष म्हणजे, राहुल हा या गावात एकटा नाही. तुळशी गावातील ४०० ते ५०० तरुणांचे वय आज ३०, ३५ ते ४० वर्षे उलटून गेले तरी ते अविवाहित आहेत. गावात पाणी नाही आणि शेती पिकत नाही, म्हणून बाहेरगावचे लोक तुळशी गावाला 'भुकाड गाव' म्हणून हिणवतात. त्यामुळे या गावात मुलगी देण्यास स्पष्ट नकार दिला जातो. आर्थिकदृष्ट्या समृद्ध असलेले गव्हाणे कुटुंब सध्या या दुष्काळासोबतच कौटुंबिक व सामाजिक विषमतेच्या दाहकतेने होरपळून निघत आहे. लग्न जुळत नसल्यामुळे अनेक तरुणांनी गाव सोडून शहराचा रस्ता धरला आहे."पाण्यावाचून मुलांची लग्ने होईनात, हीच या भागातील सर्वात मोठी शोकांतिका आहे..." एकीकडे सरकार दुष्काळमुक्तीचे मोठे दावे करत असताना, दुसरीकडे पाण्याअभावी गावाचा वैवाहिक समतोलच ढासळला आहे. दुष्काळामुळे शेतीसोबतच संपूर्ण कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होत आहे. काही दिवसांपूर्वी तुळशी गावाने 'गाव विकणे आहे' असे फलक लावले होते; त्यामागे केवळ पाण्याचा प्रश्न नव्हता, तर लग्नासारखा गंभीर सामाजिक प्रश्नही दडलेला होता, हे राहुलच्या कहाणीवरून स्पष्ट होत आहे.
दुष्काळाची ही दाहकता केवळ पिकांपुरती मर्यादित राहिलेली नसून, ती आता थेट कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. त्यामुळे तुळशी गावातील या तरुणांच्या गंभीर व्यथेकडे राज्य सरकारने तातडीने व गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.