🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गरोदरपणातील मद्यपान: एक घोटही बाळाच्या आरोग्यासाठी जोखमीचा

गरोदरपणातील मद्यपान: एक घोटही बाळाच्या आरोग्यासाठी जोखमीचा


डॉ.श्रद्धा शिंदेगर्भधारणेचे नियोजन करण्यापासून ते संपूर्ण गर्भावस्थेपर्यंत मद्यपान पूर्णपणे टाळणे हाच बाळाच्या आरोग्यासाठी सुरक्षित पर्याय असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. गर्भावस्थेत काय खावे, काय टाळावे याबाबत अनेक सूचना दिल्या जातात; मात्र मद्यपानाबाबत अजूनही काही गैरसमज आढळतात. 

अधूनमधून थोडे वाइन किंवा मर्यादित प्रमाणात मद्यपान घेतल्याने काही धोका नसतो, असे मानले जाते. प्रत्यक्षात गर्भावस्थेत मद्याचे कोणतेही प्रमाण सुरक्षित असल्याचे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. आईने सेवन केलेले मद्य हे प्लेसेंटामार्फत गर्भातील बाळापर्यंत पोहोचू शकते आणि त्याच्या मेंदूसह विविध अवयवांच्या विकासावर परिणाम करू शकते. त्यामुळे गर्भधारणेचे नियोजन करण्यापासून ते संपूर्ण गर्भावस्थेपर्यंत मद्यपान पूर्णपणे टाळणे हाच बाळाच्या आरोग्यासाठी सुरक्षित पर्याय असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. 
 
गर्भावस्थेत मद्यपानामुळे फिटल अल्कोहोल स्पेक्ट्रम डिसऑर्डर्स (FASD) ही आयुष्यभर राहणाऱ्या समस्या उद्भवू शकते. यामध्ये मुलाच्या आत्मसात करण्याची क्षमता, स्मरणशक्ती, एकाग्रता, वर्तन, संवादकौशल्य, शरीरीक समन्वय साधणे, वाढ आणि शारीरिक विकासावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. या समस्यांची तीव्रता प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळी असू शकते. मद्यपान केल्यानंतर अल्कोहोल प्लेसेंटामार्फत गर्भातील बाळापर्यंत पोहोचते. 
प्रौढ व्यक्तीच्या तुलनेत गर्भातील बाळाची अल्कोहोलवर प्रक्रिया करण्याची क्षमता पूर्णपणे विकसित झालेली नसते. त्यामुळे अल्कोहोलचा मेंदू तसेच इतर अवयवांच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः बाळाचा मेंदू संपूर्ण गर्भावस्थेत विकसित होत असल्याने तो अधिक संवेदनशील असतो. मद्यपानामुळे मेंदूतील पेशींची निर्मिती आणि त्यांच्यातील संपर्कांच्या विकासावर परिणाम होऊन पुढे शिकणे, स्मरणशक्ती, एकाग्रता, वर्तन आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्यास अडचणी येऊ शकतात.
मद्यपानाचा परिणाम प्रत्येक मुलावर सारखाच होतो असे नाही. काही मुलांमध्ये वाढ खुंटणे, बोलणे, भाषा, शरीराचा समन्वय साधणे किंवा आकलना संबंधित अडचणी दिसून येतात. तर काही मुलांना एकाग्रता, आवेगांवर नियंत्रण, भावनिक संतुलन किंवा इतर व्यक्तींशी जुळवून घेण्यात अडचणी जाणवू शकतात. गर्भावस्थेतील मद्यपानाचा संबंध गर्भपात, मृत बाळ जन्माला येणे ( स्टीलबर्थ) आणि मुदतपूर्व प्रसूतीसारख्या प्रतिकूल परिणामांशीही जोडला गेला आहे.

फिटल अल्कोहोल स्पेक्ट्रम डिसऑर्डर्सचे एक मोठे आव्हान म्हणजे त्याची लक्षणे बाळाच्या जन्माच्या वेळी नेहमी स्पष्ट दिसतीलच असे नाही. सुरुवातीला मूल निरोगी दिसू शकते; मात्र वय वाढत गेल्यानंतर आणि शाळेतील अभ्यासाचा ताण वाढल्यानंतर आकलन क्षमता, एकाग्रता, स्मरणशक्ती, वर्तन किंवा सामाजिक वर्तनातील अडचणी अधिक स्पष्ट होऊ शकतात.
अशा वेळी मुलाला आळशी, लक्ष न देणारे किंवा प्रयत्न न करणारे समजले जाण्याची शक्यता असते. मात्र त्यामागे विकासाशीसंबंधित अडचण असू शकते. त्यामुळे अशा मुलांना दोष देण्याऐवजी त्यांच्या समस्या वेळीच ओळखून त्यावर उपचार करणे आवश्यक आहे. वेळीच निदान, विकासात्मक तपासणी, आवश्यक उपचार, समुपदेशन, शैक्षणिक मदत आणि कुटुंबाकडून मिळणारे योग्य वातावरण यामुळे मुलाला त्याच्या क्षमतेनुसार विकास करण्यास मदत होऊ शकते.

मर्यादीत प्रमाणातील मद्यपान सुरक्षित आहे का?

गर्भावस्थेत अधूनमधून वाइन किंवा थोड्या प्रमाणात मद्यपान केल्याने काही होत नाही, असा गैरसमज अनेकदा करून घेतला जातो. मात्र गर्भावस्थेत मद्याचे कोणतेही प्रमाण सुरक्षित असल्याचे वैद्यकीयदृष्ट्या निश्चित झालेले नाही. त्याचप्रमाणे गर्भावस्थेतील असा कोणताही विशिष्ट कालावधीही निश्चित नाही, ज्यामध्ये मद्यपान सुरक्षित मानले जाऊ शकते. बाळाचा मेंदू संपूर्ण गर्भावस्थेत विकसित होत असल्याने वेगवेगळ्या टप्प्यांवर मद्याच्या संपर्काचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गर्भधारणेचा विचार करणाऱ्या महिलांनी आणि गर्भवती महिलांनी मद्यपान पूर्णपणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.

गर्भधारणा झाल्याचे समजण्यापूर्वी मद्यपान केले असेल तर?
गर्भधारणा झाल्याचे समजण्यापूर्वी मद्यपान केले असल्यास अनेक महिलांना चिंता वाटते. अशा वेळी घाबरून जाण्याची किंवा स्वतःला दोष देण्याची गरज नाही. गर्भधारणा झाल्याचे समजल्यानंतर मद्यपान तातडीने थांबवणे आणि डॉक्टरांना याबाबत प्रामाणिकपणे माहिती देणे महत्त्वाचे आहे. परिस्थितीनुसार डॉक्टर योग्य समुपदेशन आणि नियमित प्रसूतीपूर्व तपासण्यांचा सल्ला देऊ शकतात. गर्भावस्थेत मद्यपान थांबवण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो; मद्यपान थांबवल्याने बाळाच्या आरोग्यासाठी आणि विकासासाठी निश्चितच फायदा होऊ शकतो.

फिटल अल्कोहोल स्पेक्ट्रम डिसऑर्डर्स टाळण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे गर्भधारणेपूर्वीपासून आणि संपूर्ण गर्भावस्थेत मद्यपान टाळणे. ९ सप्टेंबर रोजी पाळला जाणारा आंतरराष्ट्रीय फिटल अल्कोहोल स्पेक्ट्रम डिसऑर्डर्स जनजागृती दिनानिमित्त गर्भावस्थेत मद्याचे कोणतेही सुरक्षित प्रमाण, सुरक्षित वेळ किंवा सुरक्षित प्रकार ज्ञात नाही हा मोलाचा संदेश दिला जात आहे. बाळाच्या मेंदूचा विकास हा त्याच्या जन्मापूर्वीच सुरू झालेला असतो आणि मद्यपान टाळणे हे येणाऱ्या बाळाच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी आईकडून घेतले जाणारे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

(लेखिका फीटल मेडिसिन एक्स्पर्ट आहेत.)


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.