एककीकडे अशी कथा आहे की सावित्रीने आपल्या पतीला मरणाच्या दारातून परत आणण्यासाठी वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्या आणि आपल्या सत्यवानाला दीर्घायुष्य मिळवून दिल. मात्र दुसरीकडे कलियुगात देवदेवतांच्या नावाखाली अंधश्रद्धेचा बाजार पाहायला मिळत आहे. पतीचा मंगळदोष दूर करण्याच्या नावाखाली एका विवाहित महिलेने अघोरी प्रकार केला. सदर घटना पुण्यात पुण्यातील चंदननगर परिसरात घडली असून पोलिसांनी महिलेच्या पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ११ एप्रिल ते ९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत संबंधित प्रकार घडला. तक्रारदार महिलेकडे लग्नासाठी १५ लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी दोन लाख २० हजार रुपये तिने ऑनलाइन पद्धतीने दिले. मात्र, उर्वरित रक्कम न दिल्याने तिचा मानसिक छळ सुरू करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, महिलेच्या पतीचा मंगळदोष असल्याचे सांगून तो दूर करण्यासाठी तिला एका भोंदूबाबाकडे नेण्यात आले. संबंधित व्यक्तीच्या सांगण्यावरून पाण्यात अंगारा टाकून तो पाजण्यासह विविध अघोरी प्रकार करण्यास तिला भाग पाडल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच तिच्या गुप्तांगाला हळद-कुंकू वाहून पूजा करून घेतल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.या प्रकरणी २९ वर्षीय विवाहितेने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार प्रदीप मनोहर पाटील (वय ३२), मालण मनोहर पाटील (वय ५२), प्रतीक्षा मनोहर पाटील (वय २९, सर्व रा. सरोळी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर), प्रितम मनीष पाटील (वय ३०) आणि मनीष पाटील (दोघे रा. नांदेड सिटी, पुणे) यांच्याविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चंदननगर पोलिसांकडून सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.